नागपूर - अंतिम वर्षाच्या परीक्षेचा गोंधळ सुरू असतानाच आता प्रथम व व्दितीय सत्रातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरून भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) आक्षेप घेतले आहे. अकोला कृषी विद्यापीठाने जारी केलेल्या गुणपत्रिकेवर कोव्हिड -१९ च्या शिक्क्यावरून हे आक्षेप घेण्यात आले आहे. शासनाकडून परीक्षा न घेता गुणपत्रिकेवर 'प्रमोटेड' असा शिक्का लावण्यात येतोय. त्यामुळे शासन विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत असल्याचा आरोप अभाविप विदर्भ प्रांत मंत्री रवी दांडगे यांनी केले आहे.
अंतिम वर्षाच्या परीक्षेचा मुद्दा ऐरणीवर असतानाच आता प्रथम आणि द्वितीय सत्रातील विद्यार्थ्यांचा प्रमोटचा मुद्दा पुढे आला. गुणपत्रिकेवर 'कोव्हिड -१९ प्रमोटेड' अशा आशयाचा शिक्का मारण्यात येतोय. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला या विद्यापीठाने नुकतेचे प्रथम व व्दितीय सत्रातील विद्यार्थ्यांना प्रमोट केले असल्याची माहिती पुढे आली आहे. याच मुद्यावरून अभाविपने आक्षेप घेत संबंधित निर्णयाला विरोध दर्शवला आहे.
शासनाने परीक्षा न घेता विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नये,असे अभाविपच्या नेत्यांनी म्हटले आहे. विद्यार्थांना भविष्यात अडचणी येईल असे कोणतेही पाऊल उचलने चूकीचे असल्याचे मत त्यांनी मांडले आहे. राज्य शासन कोरोनाच्या नावाखाली परीक्षा न घेता असे निर्णय घेत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात याचे परिणाम भोगावे लागू शकतात. विशेष म्हणजे कृषी पदवीतील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर 'कोव्हिड -१९ प्रमोटेड' असा उल्लेख करणे अत्यंत चूकीचे असल्याचा आरोप अभाविपने केलाय. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद परिक्षांसंदर्भात कायमच शासनाला सूचित करत आले आहे. कोरोना परिस्थिती नियंत्रणा नंतरच शासनाने मूल्यांकनाचा निर्णय घ्यावा. तसेच महाविद्यालयाकडूनच ते मूल्यांकन पार पडावे, अशी मागणी स्टुडंट विंगने केली आहे.