नागपूर - 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा येथे होणार असल्याची घोषणा, महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी केली आहे. आज ( 29 मे ) महामंडळाची बैठक झाली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 1967 मध्ये वर्ध्यात 48 वे संमेलन झाले होते. आता 2023 मध्ये म्हणजेच जवळपास 56 वर्षांनी ही संधी वर्ध्याला मिळाली ( Marathi Sahitya Sammelan In Wardha ) आहे.
महामंडळाच्या स्थळ समितीने वर्ध्याचा दौरा करत साहित्य संमेलनासाठी अपेक्षित जागा आणि राहण्याची सोय या सगळ्यां व्यवस्थेची पाहणी केली. यानंतर वर्धा हे साहित्य संमेलन घेण्यासाठी योग्य असल्याचे पाहून स्थळ निवड समितीने साहित्य संमेलन वर्ध्यात घेण्यात यावे, अशी शिफारस केली. यात घटक मंडळ असलेल्या विदर्भ साहित्य संघाने ही 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्ध्यात घेण्यात यावे, अशी मागणी केली होती. यातच विदर्भ साहित्य संमेलनाचे शताब्दी वर्ष आहे. सोबत घटक संस्था म्हणून आमंत्रण दिल्याने त्या अनुषंगाने पुढचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्ध्यात घेण्याचे निश्चित केल्याची माहिती उषा तांबे यांनी दिली.
वर्ध्यातील स्वालंबी महाविद्यालयाच्या 23 एकर मैदानावर हे साहित्य संमेलन पार पडणार आहे. दरम्यान, संमेलनाच्या तारखा अजून निश्चित झालेला नाही. मात्र, नोव्हेंबरपासून फेब्रुवारी 2023 दरम्यान संमेलन घेण्याचे नियोजन आहे. गोव्यात होणाऱ्या मार्गदर्शक मंडळाच्या आगामी बैठकीत संमेलनाच्या तारखा निश्चित होऊ शकते, अशी शक्यता उषा तांबे यांनी व्यक्त केली आहे.
यापूर्वी वर्ध्यात 48 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन हे वर्ध्यात 1967-68 मध्ये झाले होते. यंदा होणारे हे दुसरे साहित्य संमेलन आहे. महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या स्पर्शाने पावन झालेला हा जिल्हा आहे. यातच विदर्भ साहित्य संमेलनाच्या विनंतीला मान देऊन वर्ध्याची निवड झाली आहे, असे साहित्य संघाचे केंद्रीय शाखा समन्वयक सचिव प्रदीप दाते यांनी सांगितले.
हेही वाचा - Yashomati Thakur : नवनीत राणांनी बेशर्मीची हद्द गाठली; यशोमती ठाकूरांची बोचरी टीका