नागपूर - नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात पुन्हा कोरोनाचा कहर बघायला मिळत आहे. कारागृहातील १८ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाबाधित झालेल्या १८ कैद्यांपैकी १४ महिला कैदी, तर ४ पुरुष बंदिवानांचा समावेश आहे.
गेल्या काही महिन्यांपासून नागपूर मध्यवर्ती कारागृहातील अनेक कैदी कोरोनाबाधित झाले आहेत. मागील महिन्यातसुद्धा कैद्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर एका कैद्याला रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू देखील झाला होता.
नागपूर शहरात आणि संपूर्ण जिल्ह्यात सध्या कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर कारागृह प्रशासनाकडून कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली ज्यामध्ये १४ महिला तर ४ पुरुष कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे. सर्वाना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात(मेडिकल) येथे नेण्यात आले होते. त्या ठिकाणी औषधोउपचार केल्यानंतर सर्वांना परत कारागृहात पाठवण्यात आले आहे. कोरोनाबाधित कैद्यांची कारागृहात वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे.
गेल्या महिन्यात एका बंदिवानाचा झालं होता मृत्यू-
२० एप्रिल रोजी कमाल अहमद मोहम्मद वकील अन्सारीचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तो मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी होता. २०१५साली न्यायालयाने कमाल अन्सारीला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याला कोरोनाची लागण झाली होती, त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (मेडिकल) उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आहे.