मुंबई - राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन एनसीबीसह इतर राजकीय विरोधकांचाही चांगलाच समाचार घेतला. यावेळी बोलताना त्यांनी विरोधक मला भंगारवाला म्हणातात ते बरोबर आहे. मी भंगारवाला असून या शहरातील भंगाराला मी भट्टीत टाकून पाणी पाणी केल्याशिवाय मी शांत बसणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली.
'भंगारवाल्याची किमया विरोधकांना माहिती नाही' -
विरोधक मला मी भंगारवाला आहे, असं म्हणतात. होय, मी भंगारवाला आहे. माझे वडील या शहरात कपड्याचे आणि भंगाराचे काम करायचे. माझ्या भावाचे आजही भंगाराचे गोडावून आहे. मात्र, एका भंगारवाल्याची कियमागिरी काय असते, हे विरोधकांना माहिती नाही. एक भंगारवाला शहरातील बिनकामाच्या वस्तू गोळा करून, त्याचे तुकडे करून, त्याला भट्टीत टाकतो. त्याचप्रकारे नवाब मलिकसुद्धा या शहरातील जितक्याही बिनकामाच्या वस्तू आहेत. त्या जमा करून, त्याचे नटबोल्ट काढून, त्याला भट्टीत टाकून त्याचं पाणी-पाणी केल्याशिवाय शांत बसणार नाही, असेही ते म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी 'मी कधीही मुंबईत राहून गोल्ड स्मगलींग केले नाही, मी कोणात्याही बॅंकेचे पैसे बुडवले नाही. माझ्या घरी कधीही सीबीआय किंवा ईडीची रेड झालेली नाही. प्रामाणिकपणे मेहनत केली. त्यामुळे मी भंगारवाला असून त्याचा मला अभिमान आहे, असेही म्हटले.
'विधानसभेत गौप्यस्फोट करेल' -
पुढे बोलताना त्यांनी समीर वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्र, काशीब खान आणि एनसीबीला दिलेले पत्र, यासह विविध मुद्यांवर प्रतिक्रिया दिली. तसेच यावेळी त्यांनी खरी लढाई आता विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात होणार असून त्यावेळी पुन्हा गौप्यस्फोट करेल, त्यावेळी भाजपा नेते रस्त्यावर फिरु शकणार नाही, असा इशाराही त्यांनी भाजपाच्या नेत्यांना दिला. काल आर्यन खान याला जामीन मिळाला आहे. खरं तर एनसीबीने आर्यनवर ज्या प्रकारे आरोप लावले त्यावरून त्याला किला कोर्टातूनच जामीन मिळालायला हवा होता. मात्र, एनसीबीने जामीन रोखण्याचा प्रयत्न केला. गुन्हा सिद्ध होईपर्यंत जेलमध्ये ठेवणं चुकीचं आणि अन्यायकारक आहे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा - खरी लढाई आता विधानसभेत, भाजपा नेते रस्त्यांवर फिरु शकणार नाही; नवाब मलिकांचा इशारा