मुंबई - भायखळा मतदार संघात मुस्लिम समाजाची मते मोठ्या प्रमाणात आहेत. या मतांच्या जोरावर मागील विधानसभा निवडणुकीत एमआयएमचे वारीस पठाण निवडून आले होते. या मतदार संघात गेल्या पाच वर्षात वारीस पठाण यांनी काम केले नसल्याने एमआयएमचे अध्यक्ष ओवेसी यांना मतदारांची जाहीर माफी मागावी लागली होती. यामुळे नागरिकांचे काम करणारा आमदार मिळावा म्हणून शिवसेनेच्या यामिनी जाधव यांना मतदारांनी निवडून दिले आहे.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमचे वारीस पठाण २५ हजार ३१४, भाजपचे मधु चव्हाण यांना २३ हजार ९५७, काँग्रेसचे मधुकर चव्हाण यांना २२ हजार २१, अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी यांना २० हजार ८९५ तर मनसेचे संजय नाईक यांना १९,७६२ मते मिळाली होती. वारीस पठाण यांनी मधू चव्हाण यांचा अडीच हजार मतांनी पराभव केला होता. आमदार म्हणून निवडून आल्यावर पठाण हे म्हणावे तसे लक्ष देत नसल्याने भायखळ्यातील मतदार नव्या पर्यायाच्या शोधात होते. काँग्रेसच्या मधू चव्हाण हे १० वर्ष आमदार असताना त्यांना म्हाडाच्या अध्यक्ष पदावरही बसण्याचा मान मिळाला होता. मात्र त्यांना मतदार संघातील जुन्या इमारतींचा प्रश्न मार्गी लावता आला नव्हता. याच मतदार संघातून कुप्रसिद्ध डॉन अरुण गवळी हे सुद्धा आमदार झाले होते. त्यांची मुलगी गीता गवळी यांनी मागील वेळीही निवडणूक लढवली होती. शिवसेना सोबत असतानाही गवळी यांना म्हणावी तशी मत मिळाली नसल्याने त्यांचा पराभव झाला होता.
भायखळा मतदार संघात येणाऱ्या डॉकयार्ड परिसरात यामिनी जाधव व त्यांचे पती यशवंत जाधव नगरसेविका व नगरसेवक असताना अनेक कामे केली आहेत. यशवंत जाधव हे सध्या पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. यामुळे यामिनी जाधव यांना निवडून दिल्यास भाखळ्यातील रखडलेली कामे होतील. काही कामे राज्य सरकारकडे अडकल्यास त्यावर त्या आवाज उचलतील. तसेच पालिकेच्या अख्तयारीत काही कामे असल्यास ती कामे यशवंत जाधव करून घेतील. यामुळे भायखळ्याचा विकास होईल अशी अपेक्षा ठेवत यामिनी जाधव यांना मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून निवडून दिले आहे. मतमोजणीवेळी पहिल्या फेरीपासून यामिनी जाधव यांना बढत मिळाली होती. हि बढत शेवटच्या फेरीपर्यंत कायम ठेवल्याने यामिनी जाधव यांचा विजय झाला.