मुंबई - अमरावतीमधील(Amravati Violence) एकूण घटनाक्रम अस्वस्थ करणारा आहे. राज्यातील जनतेने शांतता राखावी. राज्यात शांतता प्रस्थापित करावी, कोणीही हिंसाचार करू नये. मात्र, महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे मोर्चे निघाले हे एक सुनियोजित षड्यंत्र वाटत आहे. त्रिपुरामध्ये(Tripura Violence) जी घटना घडली नाही, त्या घटनेवर महाराष्ट्रात अशाप्रकारे मोर्चे काढणं हे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी दिली आहे.
- त्रिपुरामध्ये तशी घटना घडलीच नाही -
त्रिपुरामध्ये तशी घटना घडलीच नसल्याचे त्रिपुराच्या पोलिसांनी सांगितले असून, त्या संदर्भातले फोटोही पोलिसांनी जारी केले आहेत. तसेच सोशल मीडियावर फिरत असलेले फोटो कसे खोटे आहेत हे देखील त्रिपुराच्या पोलिसांनी सांगितले. सोशल मीडियावर हे सर्व घटक पेटवण्याचा ज्या लोकांनी प्रयत्न केला, त्यांच्यावरही पोलिसांनी कारवाई केली असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यामुळे राज्यातील जनतेने शांतता राखावी, असे आवाहनही फडणवीस यांनी केले आहे.
- कोणीही महाराष्ट्रामध्ये दंगल करू नये-
त्रिपुरामध्ये कुठलीही घटना घडली नाही. मात्र, तरीही न घडलेल्या घटनेवर महाराष्ट्रात मोर्चे काढून दुकानं जाळली. हे योग्य नसून राज्य सरकारने यावर कडक कारवाई करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच सरकारचे नेते स्टेजवर जाऊन भडकाऊ भाषण करणार असतील तर, या दंगलीची जबाबदारी राज्य सरकारवर असेल. त्यामुळे कोणीही महाराष्ट्रामध्ये दंगल करू नये. अशा प्रकारचे मोर्चे काढून विनाकारण दुकानं टार्गेट करू नये, तसेच दोन्ही समाजाने शांतता बाळगावी, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला केले आहे.