मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीत पंतप्रधान नरेंद्रे मोदींना भेटल्यानंतर सुरू झालेल्या राजकीय चर्चांवर पूर्णविराम टाकण्यासाठी पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. शरद पवार गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत असून मोदींसोबतच्या बैठकीत सहकारी बँकांच्या विषयावर चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच या भेटीविषयी विरोधी पक्ष चूकीच्या वावड्या उठवत असल्याचेही त्यांनी सांगितले.
मोदींसोबत सहकार, लसीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा
यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट मागितली होती. त्यानुसार पवार साहेबांची पंतप्रधानांसोबत भेट झाली. यात सहकारी बँकेच्या प्रणालीत केलेल्या बदलांविषयी चर्चा झाली. सहकारी बँका राज्याच्या कायद्यानुसार तयार केल्या जातात. मात्र ग्राहकांचे पैसे सुरक्षित राहावे यासाठी RBI त्यावर देखरेख ठेवते. तसेच आजच्या कायद्यात शेअर होल्डर आपले शेअर विकू शकत नाही. मात्र नवीन नियमांनुसार शेअर विकले जाऊ शकतात. त्यामुळे काही लोकांचे बँकेवर नियंत्रण येऊ शकते, यावर या बैठकीत चर्चा झाल्याचे मलिक यांनी पत्रकारांना सांगितले. याशिवाय लसींच्या पुरवठ्यावरही बैठकीत चर्चा झाल्याचे ते म्हणाले.
विरोधी पक्ष चुकीच्या वावड्या उठवत आहे
या बैठकीनंतर विरोधी पक्ष चुकीच्या ववड्या उठवत आहेत. या बैठकीबाबत काँग्रेस नेत्यांना माहिती देण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांनाही या भेटीबद्दल कल्पना देण्यात आलेली होती. देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यात कोणतीही बैठक झालेली नाही असेही मलिक यांनी स्पष्ट केले.
गोयल परंपरेनुसार पवारांना भेटले
पीयूष गोयल यांना राज्यसभेत नेते घोषित केल्यानंतर त्यांनी परंपरेनुसार शरद पवार यांची भेट घेतली. राज्यसभेत सहकार्य मिळावे यासाठी ही भेट होती. याशिवाय राजनाथ सिंह यांच्या दालनात एक बैठक झाली. या दालनात शरद पवार यांच्यासह एके अँटोनी आणि बिपीन रावतही उपस्थित होते. सीमेवर काय परिस्थिती आहे याची माहिती राजनाथ सिंह यांनी शरद पवार यांना यावेळी दिली.
देशमुख यांना बदनाम करण्यासाठी षडयंत्र
काल ईडीने पत्रकाद्वारे माहिती दिली की, अनिल देशमुख यांच्या पत्नीच्या नावावर असलेला वरळीचा फ्लॅट आणि उरणमधील जमीन जप्त केली. सचिन वाझेच्या आरोपानंतर जप्त केलेली ही मालमत्ता मुळात 2005 मध्ये खरेदी करण्यात आली आहे. अनिल देशमुख यांनी परमबीर सिंग यांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेतले म्हणूनच त्यांना बदनाम करण्याच्या हेतूने राजकीय षडयंत्र केलं जातंय असेही मलिक म्हणाले.
हेही वाचा - PowerGame? : शरद पवारांनी दिल्लीत घेतली पंतप्रधानांची भेट, तासभर खलबतं; तर्क-वितर्कांना उधाण