मुंबई - मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात भाजप नेते किरीट सोमैया यांनी गंभीर आरोप केले आहेत. महापौरांनी वरळीच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना (एसआरए) प्रकल्पांतर्गत येणारा फ्लॅट बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊन, या फ्लॅटचा वापर त्या ऑफीस म्हणून करत असल्याचे सोमैया यांनी म्हटले आहे. याविरोधात सोमैयांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे.
दोन आठवड्यांमध्ये उत्तर सादर करण्याचे आदेश
या प्रकरणात झालेल्या भ्रष्टाचाराची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी. तसेच किशोरी पेडणेकरांवर फौजदारी कारवाई करून, त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे, अशी मागणी सोमैया यांनी आपल्या याचिकेमध्ये केली आहे. दरम्यान मुंबई उच्च न्यायालयात आज याप्रकरणी सुनावणी झाली. दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकूण घेतल्यानंतर न्यायालयाने किशोरी पेडणेकर यांच्यासह राज्य सरकार, मुंबई महापालिका आणि एसआरए प्राधिकरणाला दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्रावर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.