मुंबई - वरळी बीडीडी चाळ ( BDD Chawl Worli ) येथे मंगळवारी (दि. 30 नोव्हेंबर) गॅस सिलिंडर स्फोट ( Worli Gas Cylinder Blast ) झाला होता. या स्फोटात एकाच घरातील चार जण जखमी झाले होते. त्यामधील एका लहान बालकाचा व त्याच्या वडीलाचा मृत्यू झाला होता. आज (दि. 6 डिसेंबर) 'त्या' बालकाच्या आईचा देखील मृत्यू झाला आहे. या प्रकरणी हलगर्जीपणा झाल्याचे समोर आल्याने चौकशी समिती नियुक्त करण्यात आली असून 2 डॉक्टर व एका नर्सला निलंबित करण्यात आले आहे. या घटनेचे पडसाद पालिकेच्या स्थायी समिती आणि सभागृहात उमटले होते.
आईचाही मृत्यू -
वरळी बीडीडी चाळीत मंगळवारी सकाळी घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला होता. या स्फोटात एकाच कुटुंबातील आनंद पुरी (वय 27 वर्षे), मंगेश पुरी (वय 4 महिने), विद्या पुरी (वय 25 वर्षे), विष्णू पुरी (वय 5 वर्षे) असे चार जण जखमी झाले होते. या जखमींना नायर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र, त्याठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यात हलगर्जीपणा करण्यात आला. हा प्रकार समोर येताच मंगेश पुरी ( वय 4 महिने), विद्या पुरी (वय 25 वर्षे), विष्णू पुरी (वय 5 वर्षे) यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 1 डिसेंबर रोजी मध्यरात्री मंगेश पुरी या 4 महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाला. आनंद पुरी हे गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर नायर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. शनिवारी 4 डिसेंबरला सकाळी 9.45 च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या बालकाची आई विद्या पुरी ही ५० ते ६० टक्के भाजली होती. आज (6 डिसेंबर) सायंकाळी 5 वाजता त्यांचाही कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तर विष्णू पुरी या 5 वर्षीय मुलाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कस्तुरबा रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.
2 डॉक्टर व 1 नर्स निलंबित -
नायर रुग्णालयात पुरी कुटुंबावर उपचार करताना हलगर्जीपणा केल्याचे समोर आल्याने उपअधिष्ठाता यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. याप्रकरणी 2 डॉक्टर व 1 नर्स यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच आरोग्य विभागाचे संचालक यांच्या अध्यक्षतेखाली तीन डॉक्टरांची चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. या प्रकरणाचे पडसाद स्थायी समितीत तसेच पालिका सभागृहात उमटले आहे. स्थायी समितीची बैठक तहकूब करण्यात आली आहे. पालिकेच्या आरोग्य समितीतून भाजपाच्या 11 सदस्यांनी राजीनामा दिला आहे. पालिका सभागृहात या प्रकरणावरून शिवसेना आणि भाजपाचे नगरसेवक आपसात भिडले होते.
हेही वाचा - Worli Gas Cylinder Blast : वरळी गॅस सिलिंडर स्फोट, बालकानंतर वडीलाचाही मृत्यू
हेही वाचा - Gas Cylinder blast in BDD Chawl : मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी, भाजपा सदस्यांचा राजीनामा
हेही वाचा - Gas Cylinder blast in BDD Chawl : २ डॉक्टर, एका नर्सचे निलंबन, दोषींवर कठोर कारवाई होणार