मुंबई- वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत म्हाडाच्या मुंबई मंडळाने वरळीत फ्लॅटचा एक नमुना मार्चमधेच बांधून पूर्ण केला आहे. कोरोनाचे संकट असतानाही वरळीवासियांना हा नमुना फ्लॅट पाहायचा आहे. त्यामुळेच येथील काही संघटनांनी म्हाडाकडे अक्षरशः तगादा लावला आहे.
कोरोनामुळे म्हाडाचा नमुना फ्लॅट वरळीवासीयांना पाहणे शक्य होत नाही. या नमुना फ्लॅटचे काही फोटो व्हायरल होत आहेत. हा फ्लॅट कसा असेल यासंबंधीचे एक सविस्तर वृत्त 'ईटीव्ही भारत'ने प्रसिद्ध केले आहे
अशी आहे बीडीडी चाळ
वरळी बीडीडी चाळ ही सर्वात मोठी चाळ आहे. ही चाळ 60 एकर जागेवर असून 121 चाळी येथे वसलेल्या आहेत. तर या चाळीत सुमारे 10 हजार कुटुंब राहतात. गेली कित्येक वर्षे रखडलेल्या या चाळीच्या पुनर्विकासाला अखेर सुरुवात झाली आहे.
कोरोनामुळे रखडले सॅम्पल फ्लॅटचे उद्घाटन
रहिवाशांची पात्रता निश्चित करतानाच म्हाडाने वरळीवासीयांचे पुनर्विकासातील घर कसे असणार यासाठी नमुना फ्लॅट तयार केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या फ्लॅटचे 15 मार्च 2020 ला उद्घाटन करून तो पाहण्यासाठी खुला करण्यात येणार होता. पण कोरोनाचे संकटाने हे उद्घाटन रखडले आहे. कोरोनाचे संकट कायम असल्याने हा फ्लॅट कधी खुला होणार हा प्रश्नच आहे. या सॅम्पल फ्लॅटचे काही फोटो समोर आल्यानंतर वरळीवासीयांना कोरोनाच्या संकटातही फ्लॅट पाहण्याची घाई झाली आहे.
रहिवाशांची घाई, म्हाडापुढे पेच-
काही संघटनानी फ्लॅट लोकांना पाहण्यासाठी खुला करावा, अशी मागणी म्हाडाकडे लावून धरल्याची माहिती म्हाडातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने दिली आहे. कोरोनाच्या संकटात फ्लॅट खुला करणे अशक्य आणि हानीकारक आहे. पण संघटना मागे लागल्याने आता हा विषय म्हाडा मंडळाच्या मुख्य अधिकाऱ्यांकडे गेला आहे. ते काय निर्णय घेतात यावर सर्व अवलंबून असल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली आहे.
याविषयी अखिल बीडीडी चाळ भाडेकरू हक्क संरक्षण समितीचे सरचिटणीस किरण माने म्हणाले, की, आपण ही मागणी रहिवाशांच्यावतीने मंडळाला केली आहे. कोरोनाच्या काळात आम्ही सर्व काळजी घेवून नियमांचे पालन करून फ्लॅट बघू असे त्यांनी आश्वासनही दिले आहे. असे असेल तरी कोरोना काळात ही परवानगी कशी द्यायची, असा प्रश्न म्हाडासमोर आहे. या विषयाला राजकीय वळण लागण्याचीही शक्यता आहे. कारण, ही परवानगी मिळावी यासाठी संघटना थेट वरळीचे आमदार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना साकडे घालण्याची शक्यता आहे.
असा आहे नमुना फ्लॅट
- 500 चौ फूट क्षेत्रफळ
- 2 बीएचके (हॉल, एक बेडरूम, एक मास्टर बेडरूम, किचन, दोन बाथरूम-टॉयलेट)
- 22 मजली टॉवर
- एका मजल्यावर 6 ते 8 फ्लॅट
- दोन लिफ्ट (एक पॅसेंजर, एक स्ट्रेचर)
- आयआयटी मुंबई मान्यता प्राप्त स्ट्रक्चरल डिझाईन
- भूकंपप्रतिरोधक बांधकाम