मुंबई - निसर्गाच्या सहवासात आनंदाचे क्षण घालविण्याची आणि नवनवीन कला, संस्कृतीविषयी जाणून घेण्याची माणसाची मुलभूत प्रवृत्ती ही पर्यटनाचा मूळ आधार आहे. आज वेगवान दळणवळणाच्या साधनाने जग जवळ आले असताना देशाबरोबरच बाहेरचे जग जाणून घेण्याच्या माणसाच्या ओढीने पर्यटनाचे क्षेत्र सातत्याने विस्तारत आहे. एकूण 28 राज्य, नऊ केंद्रशासित प्रदेश, विविध संस्कृती, परंपरा, भाषा, चालीरीती यांच्या वैविध्यतेनं नटलेला भारत देश पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. या वर्षी साजरा केल्या जाणाऱ्या पर्यटन दिनाच्या पार्श्वभीमूवर भारताच्या पर्यटन क्षेत्राचा आणि वैभवाचा घेतलेला हा आढावा...
पर्यटन म्हणजे नेमकं काय बरं ?
अगदी आपल्या सोप्या मराठी भाषेत सांगायचे झाल्यास, पर्यटन म्हणजे, “एकटे किंवा समूहाने, घर आणि कामाच्या जागे व्यतिरिक्त दूर राहून तेथील गोष्टींचा आनंद घेणे व वापर करणे, तिथपर्यंत प्रवास करणे, तेथील खाणे-पिणे-राहणे, मनोरंजन, खरेदी, तेथील स्थानिकांशी संवाद-भेटीगाठी घेणे, तसेच यामध्ये समाविष्ट असणाऱ्या सर्व घटना, आपण केलेले नियोजन व आपली योजना, संपर्कात येणाऱ्या संस्था व उद्योग, या सर्वांच्या एकूण सहभाग व समावेशातून आपल्याला मिळणारा अनुभव किंवा अनुभवांची शृंखला म्हणजे पर्यटन."
जागतिक पर्यटन दिन आणि UNWTO
जागतिक पर्यटन संघटना (UNWTO) ही पर्यटनाला चालना देण्याच्यादृष्टीने या क्षेत्राच्या विविध पैलूंविषयी मार्गदर्शन करते., तसेच पर्यटन विकासासाठी कार्य करते. भारतासह या संघटनेचे 155 सदस्य आहेत. स्पेनमधील टोरोमॉलीनोज येथे 1979 मध्ये झालेल्या जागतिक पर्यटन संघटनेच्या सभेत 1980 पासून पर्यटन दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ऑक्टोबर १९९७ मध्ये इस्तंबूल, तुर्की येथे झालेल्या युएनडब्ल्यूटीओच्या (UNWTO) सर्वसाधारण सभेत असा प्रस्ताव मांडला गेला की, जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यासाठी दरवर्षी एका यजमान देशाने संघटनेचे भागीदार म्हणून काम पहावे. तेव्हापासून प्रत्येक वर्षी एक देश या दिनाचे यजमानपद भुषवतो. यावर्षी भारत हा दिनाचा यजमान देश आहे.
काय आहे या वर्षीच्या पर्यटन दिनाची संकल्पना ?
दरवर्षी पर्यटन दिनाच्या निमित्ताने पर्यटन संघटना (UNWTO) या क्षेत्राशी संबंधित विविध पैलूंवर चर्चा घडवून आणली जाते. वर्षभरासाठी एक संकल्पना निश्चित करून त्यानुसार कार्यक्रमांचे आयोजन जगभरात करण्यात येते. यापूर्वी सांस्कृतिक बंध, पर्यटन आणि जैवविविधता, महिलांसाठी संधी, पर्यावरण बदलास प्रतिसाद, क्रीडा आणि पर्यटन, खाजगी क्षेत्राचा सहभाग अशा विविध विषयांवर विचार करण्यात आला आहे. कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाची भूमिका महत्वाची आहे. म्हणूनच भविष्याचा वेध घेत या भूमिकेला अधिक महत्व प्राप्त व्हावे यासाठी संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संघटनेने यावर्षीच्या जागतिक पर्यटन दिनाला ‘पर्यटन आणि नोकरी : सर्वांसाठी उत्तम भविष्य’ असे घोषवाक्य निश्चित केले आहे.
‘पर्यटन आणि नोकरी : सर्वांसाठी उत्तम भविष्य’ या संकल्पनेमागील उद्देश
कौशल्ये, शिक्षण आणि नोकरी या विषयांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी UNWTO ही संकल्पना राबवणार आहे. पर्यटन हा जगातील रसायने आणि इंधनानंतरचा तिसऱ्या क्रमांकाचा मोठा व्यवसाय आहे. जगभरातील अनेक नागरिकांसाठी उत्कर्षाचे साधन आणि जीवनाची आशा म्हणून या क्षेत्राचे मोठे योगदान आहे. पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारांवर अनेकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. वाहतूक, हॉटेल्स, मनोरंजन आदी व्यवसायही पर्यटनाशी जोडले गेले आहेत. या संधीचा उपयोग करून ‘पर्यटन आणि नोकरी : सर्वांसाठी उत्तम भविष्य’ या संकल्पनेचा पर्यटनाच्या दृष्टीने विचार होणे आवश्यक आहे.
पर्यटनास अनुकुल भारताचा समृद्ध इतिहास
- भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन संस्कृतीपैकी एक आहे., तसेच जगातील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी भारत एक आहे
- उत्तरेला बर्फाच्छादित हिमालय आणि दक्षीणेला घनदाट वनराई असलेला भारतातील ३२,८७,२६३ वर्ग किमीचा प्रदेश पर्यटनासाठी अनुकुल असा आहे.
- भारत हा उत्कृष्ट वास्तुशिल्प, निर्मल घाट आणि वाघांचे सर्वात मोठे वास्तव्य असलेला देश आहे.
- विविध प्रकारची पाककृती, श्रद्धा, संस्कृती, कला - हस्तकला, संगीत, निसर्ग, इतिहास आणि साहसी खेळांचा अनुभव एका जागी घ्यायचा असेल, तर भारत हाच सर्वोत्तम देश आहे.
- भारतात गाणी, संगीत, नृत्य, नाट्य, नाटक, लोक परंपरा, कला, संस्कार आणि विधी, चित्रकला आणि लेखन यांचा जगातील सर्वात मोठा संग्रह आहे.
- पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत सरकारने २००२ साली ‘इनक्रेडिबल इंडिया’ नावाची मोहीम सुरू केली आहे.
- योग, अध्यात्म इत्यादी भारतीय संस्कृती आणि इतिहासाच्या वेगवेगळ्या पैलूंचे प्रदर्शन करून या मोहिमेने भारताला एक आकर्षक पर्यटन स्थळ म्हणून प्रक्षेपित करण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला आहे.
भारतातील पर्यटनाची सद्यस्थीती
- वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने (WEF) प्रकाशित केलेल्या ग्लोबल ट्रॅव्हल अॅन्ड टुरिझम कॉम्पिटिटिव्ह रिपोर्ट 2019 मध्ये भारताने ३४ व्या स्थानापासून ६ स्थानी झेप घेतली आहे.
- जानेवारी ते जुलै 2019 या कालावधीत भारतात आलेल्या परदेशी पर्यटकांची संख्या ही 60,84,353 इतकी आहे.
- जानेवारी ते जुलै 2019 दरम्यान, एकूण 15,34,293 पर्यटक ई-टूरिस्ट व्हिसाचा वापर करून भारतात दाखल झाले आहेत.
- जुलै, 2019 मध्ये भारतात आलेल्या परदेशी पर्यटकांची टक्केवारी ही इतर 15 प्रमुख पर्यटनास प्रसिद्ध असलेल्या देशांपेक्षा सर्वाधिक आहे.
- जानेवारी ते एप्रिल 2019 या कालावधीत भारताची परकीय चलन कमाई 69,177 कोटी रुपये होती. जानेवारी-एप्रिल 2018 मध्ये झालेल्या 68,354 कोटी रुपयांच्या तुलनेत ती अधिक आहे.
जिथे आवर्जून भेट दिलीच पाहिजे अशी भारतातील प्रमुख पर्यटन स्थळे
- ताजमहाल (उत्तर प्रदेश)
- फत्तेपूर सिक्री (उत्तर प्रदेश)
- अजिंठा (महाराष्ट्र)
- वेरूळ (महाराष्ट्र)
- हुमायूनची कबर (दिल्ली)
- कुतुब मीनार (दिल्ली)
- लाल किल्ला (दिल्ली)
- कळवा बीच (गोवा)
- आमेर किल्ला (राजस्थान)
- सोमनाथ मंदिर (गुजरात)
- ढोलाविरा (गुजरात)
- खजुराहो (मध्य प्रदेश)
- हम्पी (कर्नाटक)
- महाबलीपुरम (तामिळनाडू)
- काझीरंगा (आसाम)
- कुमारकोम (केरळ)
- महाबोधि मंदिर (बिहार)
- सुंदरबन (पश्चिम बंगाल)
भारतातील पर्यटन क्षेत्रापुढील प्रमुख आव्हाने
योग्य पायाभूत सुविधांचा अभाव : योग्य पायाभूत सुविधांचा अभाव हे भारतातील पर्यटन क्षेत्रासाठी सर्वात मोठे आव्हान आहे. पर्यटन-संबंधित आर्थिक आणि सामाजिक पायाभूत सुविधा - हॉटेल्स, कनेक्टिव्हिटी, मानव संसाधने, स्वच्छता, आरोग्य सुविधा इत्यादी मुख्यत्वे भारतात अविकसित आहेत.
सुरक्षितता आणि सुरक्षा समस्या : - पर्यटन क्षेत्रासमोर सुरक्षा एक मोठे आव्हान आहे. महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे वाढते प्रमाण, चोरी, फसवणूक, ओळख चोरी, दहशतवाद, सार्वजनिक हिंसा, विशेषत: विदेशी पर्यटकांविरूद्ध भारतात मोठ्या प्रमाणात होत आहे.
मानव संसाधन : कुशल मनुष्यबळाचा अभाव हे पर्यटन क्षेत्रासाठी एक आव्हान आहे. भारतीय पर्यटन आणि पर्यटन उद्योगाची वाढ कायम राखण्यासाठी विविध स्तरांवर कुशल मनुष्यबळ आवश्यक आहे.
कर : एअरलाईन्सपासून ते हॉटेलपर्यंतच्या संपूर्ण उद्योगावरील उच्च कर यामुळे महाग होतो. पर्यटनाचा विचार करता इतर देशांच्या मानाने भारताचे नुकसान होण्याचे हे एक कारण आहे.
पर्यटन अनियोजन आणि पर्यावरणीय समस्या
- पर्यटन हे इतर उद्योगांप्रमाणेच उत्सर्जन, ध्वनी, घनकचरा आणि कचरा, सांडपाणी, तेल आणि रसायने सोडणे, आदी प्रदूषणास कारणीभूत ठरू शकते.
- पर्यटनामुळे होणारी काही पर्यावरणीय समस्या
- स्थानिक संसाधनांचे कमी होत जाणे
- जमीनची अवनती होणे
- प्रदूषण (सर्व प्रकारचे)
- जैवविविधतेचा नाश अथवा बदल होणे
- घनकचरा आणि सामान्य कचऱ्याची निर्मीती
- ओल्या जमिनीवर अतिरेकी पर्यटनाचे प्रतिकूल परिणाम
- कचरा विल्हेवाट लावण्याची समस्या
पर्यटन उद्योगाचे सकारात्मक परिणाम
उत्पन्न आणि रोजगार निर्मिती : भारतात पर्यटन हे उत्पन्न आणि रोजगार निर्मिती, दारिद्र्य निर्मूलन आणि टिकाऊ मानवी विकासाचे साधन म्हणून उदयास आले आहे.
परकीय चलन कमाईचा स्रोत : पर्यटन हे भारतातील परकीय चलन उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्त्रोत आहे.
राष्ट्रीय वारसा आणि पर्यावरणाचे जतन : पर्यटन अनेक ऐतिहासिक स्थळे म्हणून हेरिटेज साइट म्हणून घोषित करून त्यांचे जतन करण्यास मदत करते.
पायाभूत सुविधांचा विकास : पर्यटन हे पायाभूत सुविधांच्या बहुविध वापराच्या विकासास प्रोत्साहित करते ज्यामुळे यजमान समुदायाला फायदा होतो, त्यामध्ये वाहतूक, आरोग्य सेवा आणि क्रीडा केंद्रांच्या विविध साधनांचा समावेश आहे.
शांतता आणि स्थिरतेचा प्रचार करणे : पर्यटन उद्योग नोकरी पुरवून, उत्पन्न मिळवून आणि अर्थव्यवस्थेत विविधता आणून भारतासारख्या विकसनशील देशात शांतता आणि स्थिरता वाढविण्यात मदत करू शकतो.
प्रादेशिक विकास : पर्यटन विकासाचा देशातील अविकसित प्रदेशांना मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. बर्याच आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या प्रदेशांमध्ये निसर्गरम्य सौंदर्य आणि सांस्कृतिक आकर्षणे असणारी क्षेत्रे आहेत
पर्यटन दिनाच्या निमित्ताने पर्यटन क्षेत्राशी संबंधीत विविध घटकांनी विकासात्मक पैलूंवर चर्चा केल्यास भविष्यातील विकासाच्या वाटा दृष्टीक्षेपात येऊ शकतील. अर्थातच यासाठी पर्यटक केंद्रस्थानी असणे गरजेचे आहे.
2019 या वर्षी साजरा केल्या जाणाऱ्या जागतिक पर्यटन दिनाच्या सर्व पर्यटकांना ईटिव्ही भारतकडून खुप खुप शुभेच्छा !