मुंबई - मुंबई उच्च न्यायालयासमोर उघड्या मॅनहोलमध्ये पडून पालिका कंत्राटदाराच्या एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. तर, दुसऱ्या एका कामगाराला वाचवण्यात स्थानिक नागरिकांना यश आले आहे. रुग्णालयात दाखल केलेल्या कामगारावर उपचार करून त्यास घरी सोडण्यात आले आहे.
हेही वाचा - Maharashtra Corona Update : शनिवारी राज्यात 782 नवे कोरोना रुग्ण; तर 770 रुग्णांना डिस्चार्ज
नागरिकांनी एकाला वाचवले
मुंबई उच्च न्यायालयाच्या गेट क्रमांक ५ समोरील पाण्याच्या पाइप लाइनचे कंत्राटदाराकडून काम सुरू आहे. मात्र, हे काम सुरू असताना तेथील उघड्या मॅनहोलमध्ये शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास पिंटू सिंग व सुकरकुमार हे दोघे कामगार पडले. त्याचवेळी तेथून ये - जा करणाऱ्या काही दक्ष नागरिकांनी तात्काळ मदतीला धावून सुकरकुमार सिंग याला अथक प्रयत्नांनी बाहेर काढले व त्याला उपचारासाठी नजिकच्या जीटी रुग्णालयात दाखल केले.
एका कामगाराचा मृत्यू
सुकुमारचा जोडीदार पिंटू सिंग हा वेळीच न सापडल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यांनी बराच वेळ शोध घेतल्यानंतर तो सापडला. त्याला जवळच्या जेजे रुग्णालयात नेल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. सदर घटनेबाबत स्थानिक पोलीस व अग्निशमन दल चौकशी करीत आहेत.
हेही वाचा - Mahaparinirvan Din : चैत्यभूमीवर जाण्याचा मार्ग सुकर, मेगाब्लॉकबाबत रेल्वेने घेतला महत्वाचा निर्णय