मुंबई -कोकणातील नितांत सुंदर समुद्राच्या बाजूने, कोकणचे सौंदर्य न्याहाळत आणि येथील पर्यटनस्थळे पाहत पाहत प्रवास करण्याची सुवर्णसंधी आता लवकरच मुंबई, नवी मुंबईकरांना उपलब्ध होणार आहे. कारण आता लवकरच मागील कित्येक वर्षे राखलेल्या 540 किमीच्या रेवस ते रेड्डी सागरी मार्गाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा (एमएसआरडीसी) कडून सुरु करण्यात येणार आहे. सरकारच्या इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीने या प्रकल्पाला नुकताच हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे आता प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करणार येणार असल्याची अनिलकुमार गायकवाड, सहव्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी यांनी 'ईटिव्ही भारत'ला दिली आहे.
'या' माजी मुख्यमंत्र्यांनी मांडली होती संकल्पना -
कोकणाला निसर्गाचे भरभरून लेणे लाभले आहे. नितांत सूंदर आणि अफाट समुद्र किनारा ही लाभला आहे. त्यामुळे मागील काही वर्षांत महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील पर्यटक गोव्या इतकाच कोकणाकडेही आकर्षित होताना दिसत आहे. मात्र, आजच्या घडीला कोकणात जाण्यासाठी पर्यटकांना मोठी कसरत करावी लागते. कारण मुंबईतुन कोकणात जाण्यासाठीचा मुंबई-गोवा द्रुतगती मार्ग रखडला असून सद्या असलेल्या रस्त्याची पुरती दुरवस्था झाली आहे. त्यामुळे पर्यटकांची ही गैरसोय लक्षात घेत, हा प्रवास सुकर करण्यासह कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी रेवस ते रेड्डी सागरी मार्ग प्रकल्पाची संकल्पना पुढे आणण्यात आली होती. महत्वाचे म्हणजे ही संकल्पना माजी मुख्यमंत्री बॅ ए आर अंतुले यांनी मांडली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा प्रकल्प राबवण्यात येणार होता. मात्र, पुढे याचे काहीच झाले नाही आणि प्रकल्प रखडला.
एमएसआरडीसीकडे प्रकल्प हस्तांतरित -
रेवस ते रेड्डी असा मूळ मार्ग आहे. पण हा सलग मार्ग नसून मध्ये अनेक मिसिंग लेन आहेत. अनेक पूल खराब झाले आहेत. त्यामुळे पूल, मिसिंग लेन आणि खराब रस्त्याची नव्याने बांधणी करत 540 किमीचा रेवस (अलिबाग)ते रेड्डी (सिंधुदुर्ग) असा सागरी मार्ग बांधण्यात येणार आहे. हा प्रकल्प मार्गीच लागत नसल्याने अखेर सरकारने 6 ऑक्टोबर 2020 ला हा प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एमएसआरडीसीकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता लवकरच एमएसआरडीसी हा प्रकल्प मार्गी लावणार आहे.
7 खाडी पूल तर 33 गावात बायपास रोड बांधणार -
मिसिंग लेन, जुने पूल पाडून नवे पूल बांधणे यासारखी कामे या प्रकल्पात केली जाणार आहेत. त्यानुसार कोकणातील 7 मोठ्या खाड्यावर पूल बांधण्यात येणार आहेत. सद्या या खाडीवर अरुंद पूल असून त्याची रुंदी-लांबी वाढवण्यात येणार आहे. तर 33 गावात 4 ते 5 मीटर इतके अरुंद रस्ते आहेत. त्यामुळे येथे बायपास बांधण्यात येणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले आहे. रेवस ते रेड्डी दरम्यान अनेक रस्ते 8 ते 10 मीटरचे आहेत तेही आणखी 10 ते 15 मीटरने रुंद करण्यात येणार आहे. हे सर्व काम झाले की सलग 540 किमीचा सागरी मार्ग तयार होईल आणि मुंबईकरांना मुंबई-गोवा महामार्गाला पर्यायी मार्ग मिळून अलिबाग ते सिंधुदुर्ग प्रवास फास्ट आणि सुकर होईल असा दावा ही त्यानी केला आहे.
10 हजार कोटी खर्च -
लॉस अँजेलिस ते सांस फ्रान्सिस्को सागरी मार्गाच्या धर्तीवर रेवस ते रेड्डी सागरी मार्ग विकसित करण्यात येणार असल्याचा दावा एमएसआरडीसीकडून करण्यात येत आहे. हा महामार्ग समुद्र किनाऱ्यापासून जाणार आहे. त्यामुळे कोकणातील सर्व बीचचा, किल्ल्यांचा आणि पर्यटन स्थळाचा आनंद घेत प्रवास करता येणार आहे. त्यामुळे भविष्यात कोकणातील पर्यटनालाही चालना मिळेल असा ही एमएसआरडीसीचा दावा आहे. या प्रकल्पासाठी 10 हजार कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. यासाठी एमएसआरडीसीच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येणार आहे. सद्या याचा बृहत आराखडा तयार करण्यात येत आहे. हा आराखडा सादर झाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या अनुषंगाने आता काही महिन्यांतच या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प मुंबईकर आणि कोकण वासीयांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.