मुंबई:- कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा, आयटी सेवा, खासगी कार्यालये बंद आहेत. अशात अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम कल्चर स्वीकारत काम सुरू ठेवले आहे. तर, कोरोनाचा कहर कधी संपेल याचे उत्तर कुणाकडे नसून पुढची काही वर्षे तरी जगाला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे आता वर्क फ्रॉम होम कल्चर वाढणार असून त्याचा फटका मात्र व्यावसायिक मालमत्तांना बसणार आहे. कारण वर्क फ्रॉम होम झाल्यास भाड्याने वा मालकीचे ऑफिस घेण्याच्या मागणीत मोठी घट होण्याची शक्यता बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
परदेशात वर्क फ्रॉम होम कल्चर बऱ्यापैकी रुजले आहे. पण, भारतात मात्र अजूनही हे कल्चर आलेले नाही. लॉकडाऊनमध्ये मात्र नाइलाजाने सर्वच कार्यालयांनी वर्क फ्रॉम होम सुरू केले आहे. तर, आता कॊरोनाचा धोका पाहता पुढे काही वर्षे तरी लोकल-बसचा प्रवास धोकादायकच ठरणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने नोकरीसाठी बाहेर पडणे चुकीचे ठरणार आहे. त्यामुळे आयटीसह अन्यही कंपन्या हे कल्चर स्वीकारतील. परिणामी व्यावसायिक मालमत्तांची मागणी कमी होईल, असे बांधकाम क्षेत्रातील आघाडीच्या अनरॉक या कंपनीच्या एका अहवालात म्हटले आहे.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीस) ने 2025 पर्यंत 75 टक्के कर्मचारी-अधिकारी वर्ग घरून काम करेल हे जाहीर केले आहे. अंदाजे साडे तीन लाख कर्मचारी-अधिकारी वर्क फ्रॉम होम करणार आहेत. यावर पाऊल टाकून अन्य ही कंपन्या वर्क फ्रॉम होम सुरू करण्याची शक्यता असून हे कल्चर पुढे वाढत जाणार आहे. त्यामुळे त्यांना ऑफिसची वा मोठ्या ऑफिसची गरज पडणार नाही. परिणामी भाड्याने वा मालकी हक्काची कार्यालयांची मागणी घटेल असेही या अहवालात नमूद केले आहे. मंदीत असलेल्या बिल्डरांची चिंता आता यामुळे आणखी वाढणार आहे.