मुंबई - राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन यंदा नागपुरात घेण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे. यामुळे विदर्भातील जनतेचे किती प्रश्न सुटतील याबाबत शंका असली तरी कंत्राटदारांची मात्र नक्कीच चांदी होणार आहे. सरकारने या निमित्ताने कोट्यवधी रुपयांच्या कंत्राटाच्या निविदा काढल्या आहेत.
हेही वाचा - राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींना कोरोनाची लागण
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात घेण्याचा प्रघात आहे. या निमित्ताने विदर्भातील जनतेच्या विविध प्रश्नांची तड लावण्याचा प्रयत्न या अधिवेशनाच्या माध्यमातून केला जातो. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे हिवाळी अधिवेशन मुंबईतच घेण्यात आले. मात्र, यंदा हे अधिवेशन पुन्हा एकदा नागपूरला घेण्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
निघाल्या निविदा, कंत्राटदार खूष
हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार असल्याने उपराजधानीतील आमदार निवास, मंत्र्यांची निवास्थाने, रवीभवन यांची डागडुजी आणि रंगरंगोटी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कोट्यवधींच्या कामांच्या निविदा काढल्या आहेत. आतापर्यंत तीस कोटी रुपयांच्या निविदा काढल्या असून अल्पावधीतच आणखी वीस कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी आणि कंत्राटदार चांगलेच खूश झाले असून वेगाने कामाला लागल्याचे चित्र आहे.
कोणती होणार कामे?
कंत्राटदारांना कामे वाटून द्यायला सुरुवात झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यामध्ये आमदार निवास, मंत्र्यांची निवासस्थाने, मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेले रामगिरी आणि उपमुख्यमंत्र्यांच्या देवगिरीची रंगरंगोटी करण्यात येणार आहे. फर्निचर, पडदे, सोफे बदलले जाणार आहेत. याशिवाय विधिमंडळ परिसरातील रस्ते आणि फूटपाथ यांचे सुशोभीकरण तसेच रस्त्यावरील दिवे बदलले जाणार असून यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जाणार आहेत.
केव्हा होणार अधिवेशन?
येत्या ७ डिसेंबरला हिवाळी अधिवेशन नागपुरात निश्चित करण्यात आले आहे. यासाठी विधिमंडळाचे प्रधान सचिव असलेल्या राजेंद्र भागवत यांनी उच्चस्तरीय बैठकीनंतर नागपुरातच हिवाळी अधिवेशन होणार असल्याचे स्पष्ट संकेत प्रशासनाला दिले आहेत. अधिवेशनापूर्वी म्हणजे, नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार निविदा काढण्यात येत असून यामध्ये सॅनिटायझर आणि किटकनाशक फवारणी यांचाही समावेश आहे.
आधीच्या कामांची बिले थकित
विदर्भ आणि नागपूर परिसरात यापूर्वी झालेल्या विविध शासकीय कामांची अनेक बिले थकीत आहेत. इतकेच काय तर, २०१९ ला झालेल्या हिवाळी अधिवेशनातील कामांची बिलेही थकित आहेत. त्यामुळे, कंत्राटदार काहीसे नाराज असले तरी, दोन वर्षांनी कामे पुन्हा एकदा मिळत असल्याने कंत्राटदारांनी कामे करण्यास होकार दिला आहे.
हेही वाचा - मेहमूदची बहीण मिनू मुमताझ यांचे निधन