मुंबई - काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी 19 विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक 20 ऑगस्टला बोलावली होती. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील हजर होते. 2024 ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन यावेळी सोनिया गांधी यांनी केले. या बैठकीला खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती लावल्याने येणाऱ्या काळात शिवसेना काँग्रेससोबत जाणार असल्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.
शिवसेना काँग्रेससोबत जाणार? -
विरोधीपक्षांच्या झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित राहिल्यामुळे 2024 चा लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनाही यूपीए किंवा काँग्रेसप्रणित आघाडीसोबत जाणार हे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेचे राजकीय भवितव्य लक्षात घेता उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतला असावा. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर सत्तेच्या चाव्या काँग्रेसच्या हातात आल्या तर केंद्रामध्ये शिवसेनेला काँग्रेसला पाठिंबा देणे बंधनकारक झाले आहे. कारण राज्याच्या सत्तेच्या चाव्या उद्धव ठाकरे यांच्या हातात देण्यासाठी काँग्रेसने त्यांना मदत केली आहे. यामुळे येणाऱ्या काळात केंद्रातही शिवसेना आणि काँग्रेस एकत्र सरकारमध्ये बसतील, असे मत राजकीय विश्लेषक संदीप प्रधान यांनी व्यक्त केला आहे. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनातही शिवसेना खासदार संजय राऊत हे नेहमीच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निकट पाहायला मिळाले. तसेच काँग्रेसने घेतलेल्या प्रत्येक भूमिकेला शिवसेनेचा पाठिंबा पाहिला मिळाला आहे.
विविध मुद्यांवर बैठकीत चर्चा -
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीला उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीनंतर शिवसेना आता यूपीएमध्ये सहभागी होणार या चर्चेलादेखील सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पक्षाशी असलेली युती तोडून शिवसेना एनडीएमधून बाहेर पडली. त्यानंतर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला सोबत घेऊन महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्तेत आले. मात्र, राज्यात काँग्रेसशी हातमिळवणी केल्यानंतरही अद्याप शिवसेनेकडून यूपीएमध्ये जाण्यासंदर्भात कोणतेही भाष्य अद्याप केलेले नाही. 20 ऑगस्टला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देशभरातील विरोधी पक्षांना एकत्र करून यासदंर्भात महत्त्वपूर्ण बैठक घेतली. केंद्र सरकारमुळे देशपातळीवर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. महागाई, बेकारी देशात वाढत चालली आहे. देशाच्या सीमा सुरक्षित नाहीत. यासह विविध मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली. तसेच या बैठकीतून सर्व विरोधीपक्षांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र येण्याचे आवाहन सोनिया गांधी यांनी केले आहे.
'भाजपाविरोधात 2024साठीही थोपटले दंड'-
काल 20 ऑगस्टरोजी झालेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनीदेखील आपली भूमिका मांडली. देशात असलेले सध्याचे राजकीय वातावरण पाहता सर्वच विरोधीपक्षांना शेवटपर्यंत एकजूट राहणे आवश्यक आहे. सर्व विरोधी पक्ष एकत्र आल्यास केंद्रातील सत्तेला आपण सर्व मिळून पर्याय देऊ शकतो. हा विश्वास जनतेच्या मनात विरोधीपक्षांना एकत्र येऊन निर्माण करावा लागेल, असे या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. त्यामुळे शिवसेनेने आता विरोधी पक्षांसोबत राहून भारतीय जनता पक्षाच्या विरोधात 2024साठीही दंड थोपटले असल्याचे मतं राजकीय विश्लेषकांकडून मांडण्यात आले आहे.
'शिवसेना सोबत येत असेल तर स्वागत'
केंद्रात असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेबाबत नेहमीच काँग्रेसने विरोधीपक्ष म्हणून आवाज उठवला आहे. यूपीएच्या माध्यमातून सर्व विरोधीपक्षांना एकत्र आणण्याचे काम काँग्रेसने केले आहे. या यूपीएच्या गटात नव्याने शिवसेनेला सहभागी व्हायचे असेल तर, त्यांचे स्वागतच आहे. राज्यातही आम्ही सरकारमध्ये एकत्र आहोतच, असे म्हणत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी शिवसेनेचे स्वागत केले आहे.
'शिवसेना काँग्रेससमोर गुडघ्यावर बसली' -
बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच काँग्रेसचा विरोध केला. देशामध्ये उद्भवलेल्या अनेक समस्या काँग्रेसमुळे आहेत, असे अनेक वेळा बाळासाहेब ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले होते. मात्र, आता सत्तेसाठी उद्धव ठाकरे हे काँग्रेससमोर गुडघ्यावर बसले आहेत, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.
हेही वाचा - जन आशीर्वाद यात्रेतून राणे कोकणात कोरोनाची तिसरी लाट आणत आहेत - विनायक राऊत