मुंबई : उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये राज्य आलंय की त्यांच्यावर राज्य आलंय, असा प्रश्न सध्या अनेकांना पडल्याची खोचक टीका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. राज्य सरकारवर एकापाठोपाठ होणाऱ्या आरोपासंदर्भात विचारणा करण्यात आली असता राज ठाकरेंनी त्यांच्या खास शैलीत उत्तरं दिली.
.. की उद्धव ठाकरेंवर राज्य आलंय?
राज ठाकरेंनी त्यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यांना हात घातला. यावेळी महाविकास आघाडी सरकारवरील आरोपांमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या झालेल्या कोंडीविषयी प्रश्न विचारण्यात आला असता तेव्हा राज ठाकरेंनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिले. 'नुकताच मला एका मित्राने मेसेज पाठवला होता. उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये राज्य आलंय की, उद्धव ठाकरेंवर राज्य आलंय? असा मजकूर त्यामध्ये होता' असे राज ठाकरे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
पद गेल्यानंतरच 100 कोटींचा साक्षात्कार का झाला?
पोलीस दलात बदल्यांचे बाजार होणे ही काही नवी बाब नाही. आपण सरकारला वेळ दिला पाहिजे असे ते परमबीर सिंग प्रकरणावर बोलताना म्हणाले. अनिल देशमुख पैसे गोळा करण्यासंदर्भात जे बोलले, ते लांछनास्पदच आहे. पण परमबीर सिंग यांना 100 कोटींचा साक्षात्कार पद गेल्यानंतरच का झाला? असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
...म्हणून विरोधक सरकार पाडण्याची भाषा करतात
भाजपचे नेते सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप महाविकास आघाडीचे नेते करत असतात. पण सरकार अशाप्रकारे पडायला काय इमारत आहे का? पिलर काढले आणि सरकार पडले असे होणार आहे का? तुमचे मंत्री चुका करतात म्हणूनच विरोधकांना संधी मिळते ना असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
अँटिलियासमोर स्फोटकांची गाडी कुणी ठेवली?
अँटिलियासमोर स्फोटकांची गाडी कुणी ठेवली याचा तपास झाला पाहिजे असा पुनरूच्चार केला. राज्यात वारंवार लॉकडाऊन करणे योग्य नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मुकेश अंबानी यांच्या घराच्या खाली स्फोटकांनी भरलेली गाडी कुणी ठेवली होती? याचा तपास आधी झाला पाहिजे असे राज ठाकरे म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विलगीकरणात असून मी त्यांना फोन केला होता. महाराष्ट्र हे औद्योगिक राज्य आहे. राज्याची लोकसंख्याही खूप आहे. त्यामुळे सतत लॉकडाऊन लागणं योग्य नाही. मी मुख्यमंत्र्यांना काही सूचना केल्या आहेत असे राज म्हणाले.
छोट्या उद्योजकांना दिलासा द्यावा
उत्पादन करून जर विक्री होत नसेल तर काय फायदा? त्यामुळे लहान उद्योजकांना सरकारने दिलासा दिला पाहिजे. आठवड्यातून एक किंवा तीन वेळा ही दुकाने उघडी ठेवा. बँकेची सक्ती जरा कमी केली पाहिजे. GST संदर्भात केंद्र सरकारशी राज्यसरकारने बोलून घेतलं पाहिजे असे राज म्हणाले. अर्थव्यवस्था कोसळली आहे आणि समाजमनंही कोसळलं आहे. कोविडच्या काळातील कंत्राटी कामगारांना पुन्हा बोलावून घ्यावं आणि त्यांना कुठे तरी कामाला लावा अशी मागणी मी केल्याचे राज म्हणाले.
तहान लागल्यावर विहीर खोदणे योग्य नाही
तहान लागली की विहीर खोदणं हे बरोबर नाही. सराव करणाऱ्या खेळाडूंसाठीही काहीतरी सवलत सरकारने दिली पाहिजे. सरकारच्या तिजोरीची स्थिती आपण ऐकली आहे. शाळांची फी आकारणी अजूनही सुरूच आहे. मुलांचे दीड वर्ष फुकट गेले आहे. 10 वीच्या विद्यार्थाना प्रमोट केलं पाहिजे असेही राज म्हणाले.
आरोग्य व्यवस्था बळकट केली पाहिजे
महानगरपालिका आणि राज्य सरकारने आरोग्य व्यवस्था बळकट करायला हवी होती. पण त्यासंदर्भात राज्य सरकार काही करत नाहीये असेही ते म्हणाले.
जमील शेख हत्येवरूनही निशाणा
जमील शेख यांची हत्या झाली होती. महाराष्ट्र पोलिसांनी याचा छडा लावला आहे. नजीब मुल्ला यांच्या सांगण्यावरून ही हत्या झाल्याचं आरोपींनी सांगितले आहे. सत्ता असणाऱ्या लोकांनी दिवसा ढवळ्या ही हत्या केली आहे. NCP च्या नेत्यांवर कारवाई होणं गरजेचं आहे असेही राज म्हणाले.