मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षण लॉटरी काढण्यात आली आहे. या लॉटरीनुसार पालिकेच्या २४ विभागापैकी ओबीसींना ७ विभागात, सर्वसाधारण महिलांना ६ विभागात तर सर्वसाधारण उमेदवारांना ८ विभागात सर्वाधिक प्रतिनिधित्व मिळाले आहे. एफ नॉर्थ सारख्या विभागात एक प्रभाग वगळता सर्वच प्रभाग महिला झाले आहेत. यामुळे अनेकांचे राजकीय भविष्य अंधारमय झाले आहे.
ओबीसींना या विभागात सर्वाधिक आरक्षण - मुंबई महानगर पालिकेच्या २३६ प्रभागांसाठी ३१ मे ला लॉटरी काढण्यात आली होती. त्यावेळी ओबीसी समाजाला आरक्षण नसल्याने ओबीसी आरक्षण लॉटरी काढण्यात आली नव्हती. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण पुन्हा बहाल केले आहे. त्यासाठी अनुसूचित जाती, जमातीचे आरक्षण तसेच ठेवून महिला आरक्षण रद्द करण्यात आले आहे. त्यानंतर पुन्हा ओबीसींच्या ६३ जागांसह आरक्षण लॉटरी काढण्यात आली आहे. यामुळे एफ नॉर्थ विभागात ओबीसींना ४, के वेस्ट विभागात ५, एम इस्ट विभागात ५, एन घाटकोपर विभागात ७, पी नॉर्थ विभागात ५ तसेच इतर विभागात आरक्षण मिळाले आहे.
याठिकाणी सर्वसाधारण प्रभागातून संधी - सर्वसाधारण म्हणजेच ओपन प्रभागातून निवडणूक लढवण्यासाठी सर्वाधिक उमेदवार इच्छुक असतात. पालिकेच्या २४ विभागापैकी पी नॉर्थ विभागात ८, के वेस्ट विभागात ७, के इस्ट विभागात ६, एस विभागात ६, एच इस्ट विभागात ५, आर साऊथ विभागात ५, आर सेंट्रल विभागात ५, एम ईस्ट विभागात ५, एफ साऊथ विभागात ४ प्रभाग ओपन आहेत. ओपन प्रभागातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना येथून निवडणूक लढवण्याची संधी आहे. एफ नॉर्थ व सी विभागात एकही प्रभाग ओपन नसल्याने येथील उमेदवाराना यंदाची निवडणूक लढवता येणार नाही.
या विभागात महिलांना संधी - एफ नॉर्थ विभागात सर्वसाधारण महिला आणि ओबीसी महिला यांच्यासाठी प्रभाग आरक्षित झाले आहेत. यामुळे या विभागातून यंदाच्या निवडणुकीत पुरुषांना निवडणूक लढवण्याची संधी नाही. एल विभागात ८, आर साऊथ विभागात ७, एफ नॉर्थ विधाता ६, पी नॉर्थ विभागात ५, एस विभागात ५, जी नॉर्थ विभागात ४, एम इस्ट विभागात ४, पी साऊथ विभागात ४ प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाले आहेत. या ठिकाणी महिलांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहे.
अनुसूचित जातीला या ठिकाणी संधी - मुंबई महानगरपालिकेच्या २३६ पैकी १५ प्रभाग अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी ८ प्रभाग महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. अनुसूचित जातीला सर्वाधिक एल विभागात ३, जी नॉर्थ विभागात २, एम वेस्ट विभागात २ प्रभाग आरक्षित झाले आहेत. या विभागातून अनुसूचित जातीच्या उमेदवारांना संधी उपलब्ध झाली आहे.
खुल्या वर्गातून उमेदवाराने कुठे जायचे? - सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना आरक्षण देण्याचे आदेश दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुंबईत कोणत्या प्रभागात ओबीसी आरक्षण असेल, असा उल्लेख करणारी पुस्तिका प्रसारित करण्यात आली. त्यामुळे आरक्षणाबाबत माझ्या मनात शंका आहे. लॉटरी सिस्टीम ही एक डोळा मारण्याशिवाय काहीच नाही. जर तुम्ही १७६- १९३ वॉर्ड पाहिला तर ते सर्व ओबीसी, एससी, एसटी किंवा महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत. खुल्या वर्गातून उमेदवाराने कुठे जायचे ? मी आधीच हायकोर्टात धाव घेतली आहे. आता आम्ही आमच्या याचिकेत सुधारणा करू आणि आमच्या तक्रारी मांडू अशी प्रतिक्रिया माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी दिली आहे.
ओबीसी आरक्षणाबाबत निराश - ओबीसी आरक्षणाबाबत मी खूप निराश आहे. घाटकोपर पूर्वमध्ये 6 निवडणूक प्रभाग आहेत. त्यापैकी 5 आता ओबीसी उमेदवारांसाठी राखीव आहेत. खुल्या उमेदवारांसाठी फक्त एक प्रभाग (136) शिल्लक आहे. आधी प्रभाग पुनर्रचनेत तीन ते चार वॉर्ड फोडून एक वॉर्ड केला आहे. पुढे त्यांनी या प्रभागांवर आरक्षण टाकले, जे अन्यायकारक आहे. मी माझा आक्षेप पालिका अधिकाऱ्यांसमोर मांडणार आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी गटनेत्या राखी जाधव यांनी दिली आहे.
एकूण प्रभाग - २३६
अनुसूचित जाती - १५ ( ८ महिला )
अनुसूचित जमाती - २ ( १ महिला )
ओबीसी - ६३ ( ३२ महिला )
सर्वसाधारण महिला - ७७
खुला वर्ग - ७८
हेही वाचा - Chawl culture : मुंबईची ओळख जपणारी चाळ संस्कृती, सुमारे 20 हजार चाळी पुनर्विकासाच्या कचाट्यात
हेही वाचा - Mumbai University : 'विद्यार्थी संघटना शाहू महाराजांचे नाव देण्यावर ठाम', कुलगुरूंनी घेतली भेट