मुंबई - राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार कमी झाल्याने राज्य सरकारने 'ब्रेक द चेन' अंतर्गत निर्बंधांमध्ये शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत राज्य सरकारने आजच परिपत्रक काढले आहे. मात्र, मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्याचा निर्णय तेथील स्थानिक प्रशासनाचा आपत्कालीन व्यवस्थापन विभाग घेणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे मुंबई महापालिकेकडून कोणते निर्बंध शिथिल केले जाणार आहे, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - मुंबईत आदिवासी लोकांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती करुन केले लसीकरण
या वेळेत दुकाने, उद्याने सुरू राहू शकतात -
राज्यात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू आहेत. ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी आहे त्या विभागात हे निर्बंध शिथिल करण्यात येत असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. त्यानुसार अत्यावश्यक व अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने आणि मॉल सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजेपर्यंत, तर शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवावी लागणार आहेत. रात्री 9 ते पहाटे 5 पर्यंत संचारबंदी असणार आहे. याप्रमाणे मुंबईतील दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
50 टक्के क्षमतेने हे सुरू राहू शकते
जिम, योगा, सलून, ब्युटी पार्लर आणि स्पा एअर कंडिशन न लावता 50 टक्के क्षमतेने सुरू करता येणार आहेत. सर्व रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. त्यानंतर रात्रीपर्यंत पार्सल आणि टेकअवे सेवेद्वारे खाद्य पदार्थ विकत घेता येणार आहेत. सर्व गार्डन उद्याने यात वॉकिंग, जॉगिंग आणि सायकलिंग करता येणार आहे, असे नियम राज्य सरकारने घेतले आहेत. त्याची अंमलबजावणी मुंबईत केली जाऊ शकते.
कार्यालये सुरू होणार -
सरकारी आणि खासगी कार्यालये 100 टक्के क्षमतेने सुरू करता येणार आहेत. मात्र, प्रवासात गर्दी होऊ नये यासाठी त्याच्या वेळा ठरवाव्या लागणार आहेत. ज्या कार्यालयात वर्क फ्रॉम होमद्वारे काम सुरू आहे, त्या कार्यालयांमधील वर्क फ्रॉम होम या पुढेही सुरू राहणार आहे.
हे राहणार बंद -
सर्व धार्मिक स्थळे पुढील आदेश येई पर्यंत बंद राहणार आहेत. सर्व सिनेमा थिएटर, नाट्य गृह, मल्टिप्लेक्स ही सुद्धा पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहेत. गर्दी होऊ नये म्हणून वाढदिवस, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणुका, निवडणुकानिमित्त रॅली, आंदोलने, मोर्चे यावर निर्बंध असणार आहेत. गर्दी टाळण्यासाठी मुंबईतही यावर बंदी असणार आहे.
लोकल ट्रेनमधून प्रवास नाहीच -
राज्यात निर्बंध शिथिल केले असले तरी अद्याप मुंबईच्या लोकल ट्रेनमधून अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांनाच प्रवास करण्याची मुभा आहे. सामान्य प्रवाशांना ट्रेनमधून प्रवास करण्याची मुभा देण्याची मागणी केली जात आहे. मात्र, राज्य सरकारकडून मुंबईकरांना लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची मुभा देण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
हेही वाचा - मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी लवकरच 14 जिल्ह्यात होस्टेल, अशोक चव्हाण यांची माहिती