मुंबई - 'गुलाब' चक्रीवादळामुळे अतिवृष्टीचा मोठा फटका महाराष्ट्राला बसला आहे. खासकरून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्यातील ही परिस्थिती पाहता विरोधी पक्षाकडून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली जाते. मात्र, शेतकरी आणि सामान्य नागरिकांना झालेल्या नुकसानाची माहिती गोळा करण्याचे काम राज्य सरकार करत आहे. ही माहिती गोळा झाल्याशिवाय राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करता येणार नाही, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा -खुशखबर! रामोजी फिल्म सिटी 8 ऑक्टोबरपासून पुन्हा होणार खुली; पाहायला मिळणार 'ही' मनोरंजनाची ठिकाणे
- पीकविम्याचे पैसे लवकर देणार - अजित पवार
अतिवृष्टीसोबतच काही भागातील धरणांचे पाणी सोडल्यामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नैसर्गिक संकट आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या शेतकरी वर्ग, लोकप्रतिनिधींकडून करण्यात येतात. राज्य सरकारकडे अनेकांच्या मागण्या प्राप्त झाल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि मी सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी पीकविम्याचे पैसे लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी विमा कंपन्यांशी चर्चा सुरु आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.
- केंद्र सरकार मदत देताना भेदभाव करते -
राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत केंद्र सरकारकडून तातडीने राज्य सरकारने मदत मागवली आहे. केंद्र सरकार किती मदत करेल हा त्यांचा अधिकार आहे. पण केंद्र सरकार इतर राज्यांना मदत करत असताना त्यामानाने महाराष्ट्राला मदत कमी करते. त्यामुळे मदत जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्राबरोबर भेदभाव केला जात असल्याचे जाणवते, अशी खंत अजित पवारांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
महाराष्ट्राच्या विविध भागात मुसळधार पावसाने पूरपरिस्थिती निर्माण झाली आणि त्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणेकडून नुकसानाबद्दलची निश्चित माहिती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करु, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
हेही वाचा - मरोळ मरोशीत मेट्रो चाचणी: आरेतील एकाही वृक्षाला धक्का लावू नका- मुख्यमंत्र्यांचे निर्देश