मुंबई - प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे लोकल प्रवासादरम्यान सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन हाेत नाही, त्यामुळे पश्चिम रेल्वेने आपल्या सर्व लाेकल फेर्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास रेल्वे बाेर्डाने परवानगी दिली आहे. शुक्रवार २९ जानेवारी पासून, पश्चिम रेल्वेवर दिवसभरात टाळेबंदी पुर्वीप्रमाणेच लाेकलच्या १३६७ फेर्या होणार आहेत.
काेराेनाच्या संक्रमणामुळे गेल्या २२ मार्चपासून लाेकलची वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर १५ जूनपासून फक्त अत्यावश्यक सेवांसाठी लाेकलची मर्यादित वाहतूक सुरू करण्यात आली होती. त्यानंतर वकील आणि महिलांना वेळेचे बंधन घालून लाेकल प्रवासाची परवानगी देण्यात आली. सध्याच्या घडीला विविध २० घटकांना लाेकल प्रवासाची मंजुरी आहे. महिलांना प्रवासाची मुभा मिळाल्याने लाेकलच्या गर्दीत वाढ झाली आहे. त्यातच विदाउट तिकिट आणि बनावट ओळखपत्राच्या आधारे प्रवास करणाऱ्यांची देखील संख्या वाढत आहे.
लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली
त्यामुळे लाेकलला पुर्वीप्रमाणेच गर्दी हाेउ लागली आहे. काेराेनामुळे साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्यासाठी एका लाेकलमध्ये ७०० प्रवाशांना प्रवासाची परवानगी आहे. परंतु लाेकलला हाेणार्या गर्दीमुळे साेशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे तीनतेरा वाजत आहेत. सध्याच्या घडीला पश्चिम रेल्वे मार्गावर दिवसभरात १२०१ लाेकल फेर्या चालविण्यात येत आहे. तर प्रवासी संख्या ११ लाख ५० हजारांच्या घरात पाेहाेचली आहे.परिणामी लाेकलची संख्या वाढविण्यात येत असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले. सर्व लाेकल सुरु करण्यात येत आहेत, मात्र सर्वांना लाेकल प्रवासाची परवानगी नाही असे देखील सुमित ठाकूर यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - अंडरवर्ल्ड डॉन अनिस इब्राहिमचा खास हस्तक केआर एनसीबीच्या रडारवर