मुंबई - लसकीकरण झालेल्या प्रवाशांनाच उपनगरीय लाेकलने प्रवास करण्याची मुभा असल्याने विना तिकिट ( Without Tickets ) प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध पश्चिम रेल्वेने ( Western Railway ) गेल्या नऊ महिन्यात मोठी कारवाई केली आहे. यात 11 लाख 76 हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत त्यांच्याकडून 68 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे.
अशी केली कारवाई - पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार एप्रिल ते डिसेंबर 2021 पर्यंत केलेल्या तपासादरम्यान, बुक न केलेल्या सामानाच्या प्रकरणांसह तिकीटविरहित किंवा अनियमित प्रवास करणारे सुमारे 11 लाख 76 हजार प्रकरणे आढळून आली. त्यांच्यावर केलेल्या दंडात्मक कारवाईतुन 68 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. याच कालावधीत, आरक्षित तिकिटांच्या हस्तांतरणाची 8 प्रकरणे आढळून आली आणि 12 हजार 85 रुपायांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय 413 भिक्षेकरी आणि 534 अनधिकृत फेरीवाले आदींनाही पकडण्यात आले. त्यापैकी 175 जणांकडून रेल्वेची थकबाकी म्हणून 60 हजार 515 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर 359 जणांवर कारवाई करून 1 लाख 33 हजार 670 दंड वसूल करण्यात आला आहे.
विना मास्क प्रवाशांवर कारवाई - रेल्वे परिसरात किंवा रेल्वेत विनामास्क प्रवासी आढळून आल्यास अथवा कुठेही थुंकण्यामुळे रेल्वे परिसरात अस्वच्छता पसरेल. त्यामुळे नागरिकांना विविध आजारांची लागण होऊ शकते. कोरोना काळात अस्वच्छता पसरविल्यास कोरोनाचा संसर्गही होऊ शकतो. त्यामुळे भारतीय रेल्वेने गेल्या वर्षीपासून विना मास्क प्रवाशांवरही कारवाई करणे सुरू केले आहे. पश्चिम रेल्वेवर 17 एप्रिल ते डिसेंबर 2021 या कालावधीत 10 हजारांहून अधिक विना मास्क कारवाईतून 19 लाख 75 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
हेही वाचा - महिला आणि बाल सशक्तीकरण योजनेसाठी डीपीडीसीतून ४६८ कोटींचा निधी - यशोमती ठाकूर