मुंबई - नवीन कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतानाच, देशातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा हा निर्णय असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. अनेक दिवसांपासून ऊन, वारा, थंडी, अशा कशाचीही तमा न बाळगता केंद्र सरकारच्या दारात शेतकरी आंदोलनासाठी बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलकांना दाद दिली नाही. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर शेतकऱ्यांवर अशी वेळ कधीही आली नव्हती, असंही यावेळी जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
केंद्राने कायदे रद्द करावेत
जोपर्यंत कायदे रद्द होत नाहीत तोपर्यंत दिल्लीत आंदोलनासाठी बसलेला शेतकरी मागे हटणार नाही. सर्वेच्च न्यायालयाने या कायद्यांना स्थगिती दिलीच आहे, त्यामुळे सरकारने देखील हा कायदा रद्द करावा व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असेही ते यावेळी म्हणाले. तसेच त्यांनी शेतकरी आंदोलनावरून पंतप्रधान मोदींवर देखील निशाणा साधला. मोदी यांनी अहंभाव सोडण्याची वेळ आली आहे. त्यांनी आपल्या अहंभाव बाजूला ठेऊन हे कायदे रद्द करावेत अशी मागणी जंयत पाटलांनी यावेळी केली.