मुंबई - शहरासह उपनगरात काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने मंगळवारी सायंकाळपासून पुन्हा झोडपायला सुरुवात केली आहे. मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने अनेक सखल भागात पाणी साचले होते. रात्रभर विश्रांती नंतर आज पहाटे पासून पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. पावसाची संततधार सुरू असल्यामुळे यामुळे हिंदमाता, किंग सर्कल आदी सखल भागात पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
मुंबईत आज सकाळ पासून पावसाने हजेरी लावल्याने दादर हिंदमाता, माटुंगा किंगसर्कल सह अनेक सखल भागात पाणी साचले. यामुळे पाणी साचलेल्या ठिकाणची वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली होती. दरम्यान हवामान खात्याने पुढील 24 तासात अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे.
मुंबईत अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. पावसाने जोर धरला असल्याने दादर हिंदमाता, सायन माटुंगा येथील किंग सर्कल आदी सखल भागात पाणी साचले आहे. यामुळे येथील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सकाळची वेळ असल्याने अत्यावश्यक सेवेवर जाणारे कर्मचारी आपल्या कामावर उशीरा पोहोचत आहेत. दरम्यान आज सायंकाळी समुद्राला मोठी भरती असल्याने त्यावेळी शहरातील अनेक ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यावेळी मुंबईकरांनी साचलेल्या पाण्यात जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पालिकेचा दावा फोल -
हिंदमाता येथे पाणी साचलेल्या ठिकाणी पोलीस नागरिकांना आणि पाण्यात आडकेल्या वाहनांना मार्ग काढून देत होते. हिंदमाता येथे पाणी तुंबू नये म्हणून पालिकेने पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या पर्जन्य जल वाहिन्यांची क्षमता दुप्पट केली आहे. यामुळे पाणी साचणार नाही, पाण्याचा निचरा लवकर होईल असा पालिकेने केलेला दावा आजच्या पावसाने फोल ठरविला आहे.