मुंबई - मेट्रो रेल्वेच्या कामात अडथळा ठरणारी जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील जलवाहिनी वळवण्याचे काम केले जाणार आहे. या कामामुळे २२ व २३ सप्टेंबरला अंधेरी पूर्व व पश्चिम तसेच गोरेगाव या विभागात पाणी कपात तसेच पाणी पुरवठ्याच्या वेळेत बदल केला जाणार आहे. या विभागातील नागरिकांनी पाण्याचा साठा करावा तसेच पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन पालिकेच्या जल अभियंता विभागाकडून करण्यात आले आहे.
मेट्रो रेल्वेच्या कामात अडथळा ठरणारी जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील पिलर नंबर १५५ ते १५६ दरम्यान असणारी १२०० मिली मीटर व्यासाची जलवाहिनी वळविण्याचे काम २२ सप्टेंबरला सायंकाळी ५.३० ते २३ सप्टेंबरच्या पहाटे ४.३० वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. या कालावधीत अंधेरी येथील ‘के पश्चिम’, ‘के पूर्व’ व गोरेगाव येथील ‘पी दक्षिण’ या तीन विभागातील काही परिसरांमध्ये पाणी कपात केली जाणार आहे. तसेच पाणीपुरवठ्याच्या वेळेतही तात्पुरता बदल करण्यात आला आहे.
या विभागात पाणी कपात, वेळेत बदल -
अंधेरी पश्चिम येथील क्रांती नगर, विलास नगर, शक्ती नगर, कदम नगर, आनंद नगर, पाटलीपुत्र, विरा देसाई मार्ग, प्रथमेश कॉम्प्लेक्स, यादव नगर, कॅप्टन सावंत मार्ग, जोगेश्वरी स्थानक मार्ग, सहकार मार्ग आणि बांदीवली हिल.
अंधेरी पूर्व येथील बांद्रेकर वाडी, फ्रान्सिस वाडी, मखरानी पाडा, सुभाष मार्ग, चाचा नगर, बांद्रा प्लॉट, हरी नगर, शिवाजी नगर, पास्कल कॉलनी, शंकरवाडी, पंप हाऊस, विजय राऊत मार्ग, पाटीलवाडी, हंजर नगर, झगडापाडा, पारसी कॉलनी, जिजामाता रोड, पारसी पंचायत मार्ग, आर. के.सिंग मार्ग, ओल्ड आणि न्यू नागरदास मार्ग, मोगरापाडा गोरेगाव पश्चिम येथील राम मंदिर आणि बिंबीसार नगर
हेही वाचा - इंदू मिल येथील स्मारकात आंतरराष्ट्रीय अभ्यास केंद्र उभे राहावे - प्रकाश आंबेडकर
हेही वाचा - रोजच्या रोज धावतेय लालपरी... पण चालक-वाहक अजूनही आर्थिक संकटात