नवी मुंबई: नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रभाग रचनेचे प्रारुप आराखडे महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केले आहेत. मात्र प्रभाग रचनेचे नियम व निकष पायदळी तुडवून महाआघाडी सरकार मधील घटक पक्षांना फायदा होईल अशीच अनुकूल प्रभाग रचना करण्यात आल्याचा आरोप नवी मुंबई भारतीय जनता पक्षाने केला आहे.
महापालिका क्षेत्रात नव्याने वाढणारे अकरा प्रभाग हे लोकसंख्येच्या आधारावर संपूर्ण शहरात समप्रमाणात वाढणे अपेक्षित आहे. मात्र प्रभाग रचना करताना निकष व नियमांचे उल्लंघन करीत सरकारमधील घटक पक्षांना फायदा होईल, यासाठी प्रशासनाला हाताशी धरून ठराविकच विभागात प्रभागांची संख्या वाढवली जात आहे. अशी लेखी तक्रार भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्य निवडणूक आयोगाला दिली होती.अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या प्रवर्गाचे आरक्षण ज्या प्रभागांमध्ये आहे त्या प्रवर्गातील नागरिकांची लोकसंख्या ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे आरक्षण ठेवण्याची गरज असते. मात्र महाविकास आघाडी कडून या परिसरात विभागणी करून ज्या प्रवर्गातील लोकसंख्या जास्त आहे ती कमी करून ते आरक्षण दुसऱ्या प्रभागांमध्ये टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. ठराविक परिसरात अकरा प्रभाग न वाढवता लोकसंख्येच्या समप्रमाणात हे प्रभाग वाढवावे व नवी मुंबई महापालिकेची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शक आणि निष्पक्षपणे पूर्ण करावी या मागणीचे निवेदन नवी मुंबई भाजपाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिले आहे. यावेळी नवी मुंबईचे माजी महापौर जयवंत सुतार माजी आमदार संदीप नाईक नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत उपस्थित होते.