मुंबई - मुंबईत शनिवारपासून कोरोना लसीकरण सुरू झाले आहे. गेल्या दोन दिवसात लसीकरणाकडे आरोग्य कर्मचाऱ्यांनी पाठ फिरवली आहे. यावर उपाय म्हणून कोविन अॅपवर नोंद असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्या जवळील कोणत्याही केंद्रावर लसीकरण करून घेण्याची सूट देण्यात आली आहे. यामुळे लसीकरणाची संख्या वाढेल अशी अपेक्षा पालिका प्रशासनाला आहे.
लसीकरणाला सुरुवात -
मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. मुंबईमधील कोरोना आटोक्यात असला तरी पूर्णपणे गेलेला नाही. कोरोनावर मात करण्यासाठी लस हेच एकमेव साधन आहे. केंद्र सरकारने सिरम आणि भारत या दोन कंपनींच्या लसीला मान्यता दिली आहे. १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. लसीकरणाच्या नोंदणीसाठी बनवण्यात आलेल्या कोविन अॅपमध्ये तांत्रिक अडचणी आल्याने दोन दिवस लसीकरण स्थगित ठेवण्यात आले होते. अॅपमध्ये सुधारणा झाल्यावर पुन्हा लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे.
कोणत्याही केंद्रावर लस घ्या -
मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार असे चार दिवस लसीकरण केले जात आहे. शनिवारी ४ हजार पैकी १९२६, मंगळवारी ३२०० पैकी १५९७ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. पालिकेच्या ९ आणि राज्य सरकारच्या १ अशा दहा केंद्रावर लसीकरण केले जात होते. या केंद्रावर ज्या लोकांना लसीकरण दिले जाणार आहे त्याची यादी दिली जात होती. नाव ज्या केंद्रावर आहे त्याच केंद्रावरच लसीकरण केले जात होते. मात्र या नियमात आज बदल करण्यात आले आहेत.
लसीकरणाचा आकडा वाढेल -
लसीकरणाचा आकडा कमी असल्याने तो वाढवण्यासाठी पालिकेने आजपासून ज्यांचे नाव कोविन अॅपमध्ये आहे अशा लोकांना पालिकेच्या कोणत्याही केंद्रावर लस घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या बदलामुळे लसीकरणासाठी लोक जवळच्या केंद्रावर जाऊन लसीकरण करून घेऊ शकतात. असे केल्याने लसीकरणाची संख्या वाढू शकते अशी पालिका प्रशासनाची अपेक्षा असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने दिली.
इतके झाले लसीकरण -
शनिवारी १६ जानेवारीला ४ हजार पैकी १९२६ लोकांना लस देण्यात आली होती. काल मंगळवारी १९ जानेवारी रोजी लसीकरणादरम्यान ३२०० पैकी १५९७ लोकांना लस देण्यात आली. हा आकडा पाहता लसीकरणाकडे आरोग्य कर्मचाऱ्यांनी पाठ फिरवली आहे.
हेही वाचा -कमळासारखे दिसते म्हणून ड्रॅगन फ्रूटचे नावच बदलले; गुजरातच्या भाजपा सरकारचा अनोखा तर्क
हेही वाचा - वाहन चालकांनो सावधान! राज्य सरकारनं उचललं एक मोठं पाऊल