मुंबई - सीपी टँक, चर्णी रोड, भुलेश्वर आदी भागात रस्त्यावर राहणाऱ्या नागरिकांना आज महापालिकेच्या सी वार्डमधील अधिकाऱ्यांनी बसमधून वांद्रे पूर्व येथे सुरू असलेल्या शेल्टर होममध्ये आणले होते. परंतु बाजूलाच एका इमारतीत कोरोनाचे अनेक रुग्ण असल्याने आम्हाला जीव धोक्यात घालायचा नाही, आमच्यासोबत आमची मुलं बाळ आहेत, आम्ही आहे त्या ठिकाणी सुरक्षित आहोत, त्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी सोडा, अशी मागणी करत जमावाने मोठा राडा केला.
या प्रकारामुळे शेल्टर होममध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मुंबई महापालिकेच्या शिवारमधील अधिकाऱ्यांनी भुलेश्वर चर्नी रोड आदी भागात रस्त्याच्या कडेला, पुलाखाली राहणाऱ्या वाघरी समाजातील महिला पुरुष आणि मुलाबाळांसह 70 जणांना वांद्रे पूर्व येथे सुरू असलेल्या उत्तर भारतीय सेवा संघाच्या हॉलमध्ये आणले होते. आम्हाला मुलुंडला घेऊन जातो म्हणून सांगून या ठिकाणी आणले असल्याचा आरोप महापालिका अधिकार्यांवर या महिलांनी केला.
आम्हाला इथे ठेवले तर आम्ही स्वतः ला जाळून घेऊ असा इशारा त्यांनी दिला. त्यामुळे हतबल झालेल्या महापालिका अधिकाऱ्याने खेरवाडी पोलिस ठाण्यातून मोठी कुमक मागवली. परंतु त्यापुढेही वाघरी समाजातील या नागरिकांनी आपली हार मानली नाही. त्यामुळे तब्बल चार तास या ठिकाणी थरार नाट्य सुरू होते. शेवटी या महिला पुरुषांना ज्या ठिकाणाहून आणले होते त्या ठिकाणी परत नेण्याचा निर्णय झाला आणि येथील शेल्टर होममध्ये असलेल्या नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.