मुंबई - देशात जमावाकडून एखाद्याची हत्या करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशा प्रकारे मॉब लिंचिंगमुळे होत असलेल्या हत्या या केवळ विशिष्ठ धर्माला आणि जातीला लक्ष्य करून केल्या जात आहेत, असा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने गुरुवारी दादर येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर मोर्चा काढला.
रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष व वंचित बहुजन आघाडीचे नेते आनंदराज आंबेडकर यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. मॉबलिंचिंग प्रकारातून होणाऱ्या हत्या रोखाव्या, नाही तर सरकारने आम्हाला तरी मारावे, असे आवाहन या आंदोलकांनी यावेळी सरकारला केले. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
वंचित बहुजन आघाडीचा भाजप कार्यालयावर मोर्चा देशामध्ये आज दलितांवर अन्याय वाढत आहे, मुस्लीम समाजालवर मॉब लिचिंग होत आहे. ख्रिश्चनांवरही दडपशाही करण्यात येत आहे. याबाबत सरकार कोणताही कडक कायदा करत नाही. सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे. तरीही सरकार या मॉबलिंचिंग विरोधात कायदा करण्याबत गंभीर नसल्याचा आरोप यावेळी वंचितच्या नेत्यांनी केला. पंतप्रधान मन की बात करत आहेत, पण आता जन की बात ऐकवण्याची वेळ आली आहे, यासाठी आम्ही हे आंदोलन केले असल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले. दरम्यान, हा मोर्चा भारतीय जनता पार्टीच्या कार्यलयापर्यंत पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी अडवला असल्याचेही आनंदराज यांनी सांगितले.