मुंबई - एसटीची जिल्हाबंदी हटवा, अशी मागणी आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. दादर येथील आंबेडकर भवनला प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद पार पडली. या वेळी आंबेडकर यांनी सार्वजनिक वाहतुकीवर अनेक प्रश्न उपस्थित केले.
प्रकाश आंबेडकर यांनी आज एसटी आणि बेस्टच्या कामगारांची बैठक बोलवली होती. बेस्ट 100 टक्के सुरू आहे, ही बातमी खोटी आहे. ज्या लहान बस कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहेत त्याच पूर्ण चालू आहेत. बेस्टच्या मालकीच्या केवळ 15 टक्के बस चालू आहेत. कंत्राटदाराच्या बस चालू असल्यामुळे बेस्टचा तोटा आहे, याचा खुलासा सरकारने केला पाहिजे, अशी मागणी आंबेडकर यांनी केली.
एसटी महामंडळ हे खाजगीकरणाच्या मार्गावर आहे. याच बरोबर एसटी महामंडळामध्ये वाहक चालक पद आता धोक्यात आहे. कामगारांना आम्ही त्यांना ज्या सूचना करायच्या आहेत त्या केल्या आहेत, असे आंबेडकर म्हणाले.
गाड्या जास्त दिवस बंद राहिल्या की खराब होतात. एक दिवस एसटी बस गाड्या बाहेर काढण्यासाठी हजर राहा, असे आवाहन त्यांनी एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांना केले. राज्यात आंतरराज्य जिल्हा बंदी आहे. ही जिल्हाबंदी हटवावी आणि नागरिकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी द्यावी. लोकांचं दळणवळण चालू व्हावं त्याची घोषणा करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली.
दिल्लीत केवळ मेट्रो बंद आहेत. वाहतूक चालू आहे. उत्तर प्रदेशमध्येही वाहतूक सेवा चालू आहेत. मग या बाबतीत महाराष्ट्र मागे का? असा सवाल त्यांनी केला. लवकरात लवकर वाहतूक चालू करा, नाहीतर पुन्हा आम्ही आंदोलन करु असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे.
अकोल्यात मंदिर खुलं केले, पंढरपूरला करणार आंदोलन
मंदिर चालू करावे यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, मी स्वतः अकोल्यातील मंदिर खुलं करून आलो, कावड ही निघाली, तिथे कोरोनाचा एकही रुग्ण निघाला नाही. मंदिराची जी मागणी आहे, ती सरकारने मान्य करावी. पंढरपूर येथे संत आंदोलन करणार आहेत. त्यांना मी शब्द दिला आहे की, मी ही तुमच्या सोबत आंदोलनाला उतरणार आहे.
पार्थ प्रकरणात काहीतरी गौडबंगाल
पार्थ पवार यांनी भाजपची स्तुती करणार विधान केले. त्यावर, पहिलं अजित पवारांना फटकारले, आता पार्थला यात काही तरी गौडबंगाल असल्याचे आंंबेडकर यांनी सांगितले.