मुंबई - माघ महिन्यातील पंचमीला वसंत पंचमी साजरी केली जाते. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, वसंत पंचमी म्हणजे सरस्वतीचा जन्म दिवस. हिंदू धर्मात वसंत पंचमीला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. या दिवशी अनेक जण घरात गोडधोड करत असतात. तर, काही जण तयार गोड पदार्थ घेऊन येतात. आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला अशा काही गोड पदार्थांची माहिती देणार आहोत, ज्यामुळे तुमचा दिवस उत्तम जाईल.
राजभोग
रसगुल्ला सारखा पदार्थ दूध आणि साखरेपासून बनवला जातो. काही खवय्यांना या पदार्थासोबत येणारी मलाई विशेष आवडते. तुमच्या घरात मधुमेहाचे रुग्ण असल्यास काही दुकानदार कमी गोड किंवा बिना साखरेचे (गुळ अथवा अन्य गोड पदार्थ वापरून) राजभोग सुद्धा बनवून देतात.
नारळाची बर्फी
हा पदार्थ विशेषतः कोकण किनारपट्टीच्या भागात सणावाराला केला जातो. नारळ, दूध, साखर आणि वेलचीचा वापर करून बनणारा हा पदार्थ वसंत पंचमीच्या निमित्ताने तुम्ही घरी आणू शकता.
बुंदी लाडू
सर्वांच्याच परिचयाचा हा पदार्थ वृद्धांना विशेष आवडतो. काही घरांमध्ये वसंत पंचमीच्या दिवशी आवर्जून बुंदी लाडू बनवले जातात आणि खाल्ले जातात.
वसंत पंचमी मागची नेमकी कहाणी काय?
शास्त्राचे जाणकार सांगतात की, या दिवसांत सरस्वती माता पृथ्वीवर अवतरते. ब्रह्मदेवांनी जेव्हा सृष्टीची रचना केली तेव्हा ती निरस आणि निस्तेज असल्याचे त्यांना जाणवले. यामुळे नाराज झलेल्या ब्रह्मदेवांनी आपल्या कमंडलातील पाणी पृथ्वीवर शिंपडले. यातून एक अद्भुत शक्तीच्या रुपात चतुर्भुजी सुंदर स्त्री प्रकट झाली. ही स्त्री म्हणजेच माता सरस्वती. जमिनीतील प्रकटलेल्या या तेजस्वी स्त्रीने पृथ्वीवरील जिवांना बुद्धी, ज्ञान आणि कला विद्या दिली. ही संपूर्ण घटना माघ महिन्यातील पंचमीला घडली. तेव्हापासून माता सरस्वतीचा जन्मोत्सव हा वसंत पंचमी म्हणून साजरा केला जातो.
हेही वाचा - डीआरएटीच्या नियुक्त्यांमधील विलंबावरून मुंबई उच्च न्यायालयाचे केंद्र सरकारवर ताशेरे