मुंबई- दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन घ्यावी, यासाठी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. मुंबईतील धारावी येथे विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले आहे. हे अयोग्य असून मुलांनी मोर्चे काढू नयेत. चर्चेला यावे, असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ( School Education Minister Varsha Gaikwad ) केले आहे.
मुंबईसह राज्यातील विविध ठिकाणी शेकडो विद्यार्थी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत. या विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन सुरू केले आहे. काही ठिकाणी तोडफोडही केली आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी परीक्षा या ऑफलाईन स्वरूपात घेतल्या जातील, असा निर्णय घेतलेला होता. या निर्णयाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी आज शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावीतल्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. दहावी आणि बारावीच्या परीक्षा या ऑनलाईनच व्हाव्यात ( SSC HSC students online exam ) या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला नाही. त्यामुळे यावर्षी ऑनलाईन परीक्षा घ्याव्यात, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येते आहे.
लहान मुलांना रस्त्यावर आणू नका - प्रा. वर्षा गायकवाड
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, की विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासाठी कोण भडकवत आहे, हे पाहिले पाहिजे. विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरून उपद्रव घडण्यामागे कोणाचा हात आहे, हे तपासण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ( Varsha Gaikwad on students agitation ) दिली आहे. लहान मुलांनी रस्त्यावर उतरू नये.
हेही वाचा-Kishori Pednekar On Tipu Sultan : महापालिकेकडे टिपू सुलतानच्या नावाने अधिकृत उद्यान नाही - पेडणेकर
विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून मुळीच मोर्चे काढू नये
विद्यार्थ्यांशी चर्चा करायला सरकार आणि आम्ही तयार आहोत. गेल्या दोन वर्षांपासून निर्माण झालेली पोकळी भरून निघावी यासाठी राज्य सरकारच्या वतीने ऑफलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना कोणत्याही पद्धतीचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी या परीक्षा असणार आहेत. मात्र जर विद्यार्थ्यांना यात कोणत्याही प्रकारच्या अडचणी वाटत असतील तर त्यासाठी विद्यार्थ्यांनी चर्चा करावी. रस्त्यावर उतरून मुळीच मोर्चे काढू नये, असे आवाहन गायकवाड यांनी केले आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि प्रवेश प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी सरकार प्रयत्न करीत असल्याचा दावाही गायकवाड यांनी केला आहे.
हेही वाचा-आमच्या परीक्षा रद्द करा, दहावी-बारावीच्या मुलांच पुण्यात आंदोलन