मुंबई - तरुणाईला भुरळ घालणारा प्रेमाचा आठवडा सध्या सुरू आहे. विविध डे साजरी करण्यात तरुण-तरुणी व्यस्त आहे. गेल्यावर्षी अनेक दिवस तरुणाईला कोणताही विशेष दिवस साजरा करता आला नव्हता. मात्र आता काही प्रमाणात जीवन पूर्वपदावर येताना दिसत आहे. यामुळे यंदाच्या व्हॅलेंटाईन डे उत्साहात साजरा होणार आहे. व्हॅलेंटाईन डे निमित्त मुंबईतील बाजारपेठ विविध वस्तूंनी सजली आहे. तसेच अनेक दुकानात वेगवेगळ्या ऑफर्स देखील या दिनानिमित्त देण्यात आल्या आहेत.
व्हॅलेंटाईन डे" प्रत्येक वर्षी 14 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. हा एकप्रकारे प्रेमीयुगुलांसाठी प्रेमाचा आणि रोमांसचा अनोखा उत्सवच आहे. या दिवशी लोक त्यांच्या प्रियकर-प्रेयसी किंवा जोडीदाराला सुंदर भेटवस्तू आणि संदेश पाठवतात. मुंबईतील बहुतांश गिफ्ट शॅाप हे लाल रंगाने सजले आहेत. कारण लाल रंग प्रेमाचे प्रतीक समजल्या जाते. काही दुकानात विशेष ऑफर देखील देण्यात आल्या आहेत.
विशेष मास्क ग्रीटिंग-
कोरोनामुळे यंदा मुंबईकरांना मास्क घालूनच घराबाहेर निघावं लागत आहे. यामुळे यंदा मास्क असलेले ग्रीटिंग कार्ड तयार करण्यात आले आहेत. या ग्रीटिंग कार्डलाही मोठी मागणी आहे. लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसाय ठप्प झाले होते. आता कुठे कोरोना हद्दपार होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे आता लोकं घराबाहेर निघून विविध विशेष दिन साजरे करत आहेत. सध्या येऊ घातलेला व्हॅलेंटाईन डे देखील उत्साहात साजरा होताना दिसत आहे. "आमच्या दुकानात साठ रुपये ते चार हजारापर्यंत भेटवस्तू उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या वस्तू यावेळी आल्या आहेत. विशेष व्हॅलेंटाईन मास्क देखील आमच्याकडे उपलब्ध आहेत, असे माटुंगा येथील सत्यम गिफ्ट गॅलरीचे पियुष व्हिसेरिया यांनी सांगितले.
ऑनलाईनला मोठा प्रतिसाद-
दुकानात जाऊन वस्तू घेण्यापेक्षा ऑनलाईन खरेदी करण्यास आजची तरुणाई धन्यता मानते. यामुळे छोट्या उद्योजकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यावेळी ऑनलाईन देखील अनेक वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. विशेष ऑफर देखील या वस्तूवर देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा- 'ज्यांना राजकारणात आणले तेच गद्दार निघाले, जुने हिशेब चुकते करणार'