मुंबई - मुंबईमध्ये गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण सुरु आहे. लसीचा तुटवडा असल्याने नागरिकांना लस मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईकरांना लस मिळत नसताना मुंबई महापालिकेला मात्र हॉटेल चालक आणि कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाची चिंता लागली आहे. यामुळे महापालिकेला मुंबईकर नागरिकांपेक्षा हॉटेल चालक आणि कर्मचाऱ्यांची काळजी अधिक असल्याची चर्चा सुरु आहे.
मुंबईत लसीकरणात अडचणी -
मुंबईमध्ये गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारीनंतर मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरु आहे. लसीकरण सुरु असताना लसीचा तुटवडा असल्याने लसीकरण अनेकवेळा ठप्प झाले आहे. लसीचा पुरवठा होत नसल्याने पालिकेने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद ठेवले आहे. ४५ वर्षावरील नागरिकांना लसीसाठी प्राधान्य दिले जात आहे. पालिकेने लसीचा पुरवठा व्हावा म्हणून १ कोटी लसीसाठी ग्लोबल टेंडर मागवले होते. त्यात सहभाग घेणाऱ्या एकाही पुरवठादाराला लस उत्पादक कंपनीसोबत कायदेशीर संबंध सिद्ध करता आलेले नाहीत. यामुळे मुंबईकरांना लास वेळेवर मिळणार कि नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हॉटेल व्यवसायिकांची चिंता -
एकीकडे मुंबईकर नागरिकांना लस मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागाने हॉटेल चालक आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घेण्यासाठी यादी बनवण्याच्या सूचना २४ विभागांच्या सहाय्यक आयुक्तांना केल्या आहेत. येत्या सोमवारपर्यंत २४ विभागातील सहाय्यक आयुक्तांनी आपल्या विभागातील हॉटेल आणि त्यामधील कर्मचाऱ्यांची यादी सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे.
पालिकेचे ग्लोबल टेंडर -
मुंबईमध्ये दीड कोटी नागरिक राहत असून त्यांचे लसीकरण लवकरात लवकर करता यावे यासाठी पालिकेने राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे लसीची मागणी केली. त्यानंतरही लसीचा पुरवठा हवा तसा होत नसल्याने अनेकवेळा लसीकरण ठप्प ठेवावे लागत आहे. मुंबईकरांना लसीकरण करता यावे म्हणून पालिकेने लसीच्या पुरवठयासाठी ग्लोबल टेंडर काढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पुरवठादार कंपन्यांकडून प्रस्ताव मागवण्यात आले. १० पुरवठादार कंपन्यांनी प्रस्ताव पाठवले होते. मात्र, त्यापैकी एका कंपनींने माघार घेतल्याने ९ पुरवठादार राहिले होते. या ९ पुरवठादारांच्या कागदपत्रांची तसेच लस उत्पादक कंपनीसोबत असणाऱ्या त्यांच्या कायदेशीर संबंधांची तपासणी केली जात होती. यासाठी पालिकेचे दोन अतिरिक्त आयुक्त काम करत होते. पुरवठादार आणि लस बनवणाऱ्या कंपन्या यांच्यामधील कायदेशीर बाबी तपासल्या गेल्या. त्यानंतर एकही पुरवठादार कंपनी १ कोटी लसीचा पुरवठा करू शकत नाही हे स्पष्ट झाल्याने पालिका प्रशासनाने ग्लोबल टेंडर रद्द कारण्याचा निर्णय घेतला आहे.
35 लाख 7 हजार 19 लाभार्थ्यांना लस -
मुंबईत आतापर्यंत एकूण 35 लाख 7 हजार 19 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. त्यात 27 लाख 45 हजार 368 लाभार्थ्यांना पहिला तर 7 लाख 61 हजार 651 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आतापर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांना 3 लाख 4 हजार 950, फ्रंटलाईन वर्कर्सना 3 लाख 62 हजार 708, ज्येष्ठ नागरिकांना 12 लाख 34 हजार 813, 45 ते 59 वर्षांमधील नागरिकांना 11 लाख 86 हजार 238 तर 18 ते 44 वर्षांमधील नागरिकांना 4 लाख 14 हजार 291, 1 हजार 433 स्तनदा मातांचे तसेच देशाबाहेर शिक्षण घेण्यास जाणाऱ्या 2 हजार 586 विद्यार्थ्यांना लसीचे डोस देण्यात आले आहेत.