मुंबई - मुंबईत कोरोना लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे लसीचा तुटवडा जाणवत आहे. लसीच्या तुटवड्यामुळे ४५ वर्षावरील लसीकरण गेले चार दिवस बंद होते. ते लसीकरण आज मंगळवार पासून सुरू होत आहे. त्याचप्रमाणे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचेही लसीकरण केले जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
लसींचा तुटवडा -
मुंबईत लसीचा तुटवडा असल्याने ४५ वर्षावरील लसीकरण बंद होते. सोमवारी पालिकेला लसीचा काही साठा आल्याने पुन्हा ४५ वर्षावरील लसीकरण सुरू केले जात आहे. उपलब्ध मर्यादीत लससाठा पाहता, फक्त दुसरा डोस घेण्यासाठी येणाऱयांनाच लस देण्यात येणार आहे. कोविन ऍपमध्ये नोंदणी केलेल्या व थेट येणाऱया (वॉक इन) नागरिकांनाही यात लस देण्यात येईल. संबंधित केंद्रांची यादी अद्ययावत करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु असून ही यादी महानगरपालिकेच्या समाजमाध्यमांवरुन व प्रसारमाध्यमांतून प्रसारित करण्यात येणार आहे.
१८ ते ४४ वयोगातील लसीकरण -
दरम्यान, १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचा विचार करता, सध्या सुरु असलेल्या व्यवस्थेप्रमाणे, बृहन्मुंबई महापालिकेच्या निर्देशित ५ लसीकरण केंद्रावर प्रत्येकी ५०० नागरिक याप्रमाणे, सकाळी ९ ते ५ या नियमित वेळेत लसीकरण करण्यात येणार आहे. हे लसीकरण केवळ 'कोविन ॲप' मध्ये नोंदणी केलेल्या आणि ज्यांना निर्धारित लसीकरण केंद्र आणि वेळ (slot) दिलेले आहे, अशा व्यक्तींसाठी असणार आहे.
मुंबई महापालिकेचे आवाहन -
लशींच्या मात्रांचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप त्या-त्या वेळी योग्य निर्णय घेतला जाईल आणि नागरिकांना अवगत करण्यात येईल. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
..या ५ केंद्रावर लसीकरण -
१. बा. य. ल. नायर सर्वोपचार रुग्णालय (मुंबई सेंट्रल परिसर).
२. सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमिदास व्होरा सर्वोपचार रुग्णालय, राजावाडी (घाटकोपर परिसर)
३. डॉ. रुस्तम नरसी कूपर सर्वोपचार रुग्णालय (जुहू विलेपार्ले पश्चिम परिसर)
४. सेव्हन हिल्स रुग्णालय (अंधेरी परिसर).
५. वांद्रे कुर्ला संकुल येथील जम्बो कोविड सेंटर.