मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत शासकीय व महानगरपालिका केंद्रांवर ४ नोव्हेंबर ते रविवार ७ नोव्हेंबर २०२१ असे चार दिवस लसीकरण बंद राहणार आहे. महानगरपालिका प्रशासनाकडून याची माहिती देण्यात आली आहे.
लसीकरण मोहीम
मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. गेल्या दीड वर्षात मुंबईत कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. या मोहिमेदरम्यान 88 लाख 98 हजार 758 नागरिकांना लसीचा एक डोस देण्यात आला आहे. तर 53 लाख 63 हजार 755 नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत एकूण 1 कोटी 42 लाख 62 हजार 513 लसीचे डोस देण्यात आले आहेत. या कालावधीत अनेक वेळा लसीचा तुटवडा असल्याने लसीकरण बंद ठेवण्यात आले होते.
चार दिवस लसीकरण बंद
मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर उद्या गुरुवार ४ नोव्हेंबर ते रविवार ७ नोव्हेंबर २०२१ असे चार दिवस कोविड लसीकरण बंद राहणार आहे. महानगरपालिकेकडे कोविड लसींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. सोमवार, दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ पासून लसीकरण मोहीम पूर्ववत सुरु राहणार आहे. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.