मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातील सायबर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी मुंबईतील 94 पोलीस ठाण्यात सायबर सेल स्वतंत्रपणे उघडण्यात आले आहे. मात्र, सध्या याच सायबर सेल विभागात तपासासाठी पोलीस कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ कमी असल्याचे दिसून येत आहे. माहिती अधिकाराखाली ही बाब समोर आली आहे.
हेही वाचा - अजित पवारांचे बंड फसले, भ्रमाचा भोपळा फुटला; 'सामना'तून 'बाण'
मुंबई पोलिसांच्या सायबर सेल विभागात एकूण 60 पैकी 47 पदे कार्यरत असून 13 पदे रिक्त आहेत. या 60 पैकी पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस शिपाई हे पद अति महत्वाचे आहे. पोलीस उपनिरीक्षकांची 17 पदे मंजूर असून यापैकी फक्त 7 कार्यरत आहे. एकूण पोलीस उपनिरीक्षकांची 10 पदे रिक्त आहेत. त्याशिवाय 26 पोलीस शिपाईचे पदे मंजूर असताना 18 पदे ही रिक्त आहेत, फक्त 8 पोलीस शिपाई कार्यरत आहेत. मंजूर पदे नसतानाही पोलीस उपनिरीक्षक ऐवजी 9 सहाय्यक पोलीस निरीक्षक कार्यरत आहेत व 3 पोलीस हवालदार आणि 7 पोलीस नाईक कार्यरत आहेत. 1 पोलीस निरीक्षक हे पद रिक्त आहे.
दररोज घडणाऱ्या सायबर गुन्ह्यांची संख्या ही खूपच मोठी आहे. कमी मनुष्यबळ असल्याने एकंदरीत याचा ताण पोलिसांवर येत असून परिणामी गुन्ह्याची उकल विलंबाने होत आरोपींची धरपकडही उशिरा होत आहे.