मुंबई - वरळी समुद्र किनारी काही अनधिकृत बांधकामे झाली आहेत. याबाबत माहिती मिळताच महापालिकेने कोळीवाडा विभागातील रहिवाशांना अधिकृत असल्याचे पुरावे सादर करण्याच्या नोटीस दिल्या आहेत. याप्रकरणी स्थानिक रहिवाशांनी आपले पुरावे पालिकेच्या जी साऊथ विभागात सादर केले आहेत. या कागदपत्रांची छाननी करून अनधिकृत बांधकामावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
अनधिकृत बांधकामे -
मुंबईच्या वरळी समुद्र किनारी कोळीवाडा येथे कोळी समाजातील लोकांच्या अनेक पिढ्या राहत आहेत. या ठिकाणी एसआरए प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यापार्श्वभूमीवर या भागात स्थानिक भूमाफियांची दादागिरी वाढली आहे. त्यांनी अनधिकृत बांधकामे केली आहेत त्यावर कारवाई होत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. आतापर्यंत अशी काही घरे या ठिकाणी उभारली असून ती भाड्याने दिली जातात किंवा लाखोंमध्ये विकली जात आहेत, त्यासाठी स्थानिक नागरिकांनी पालिकेच्या स्थानिक जी साऊथ कार्यालयाकडे तक्रार केली होती.
कागदपत्रे सादर करा -
स्थानिकांनी अनधिकृत बांधकामाच्या विरोधात केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पालिकेने दोन दिवसापूर्वी येथील सर्वच रहिवाशांना नोटीस बजावल्या होत्या. बांधकाम करण्यासाठी घेतलेल्या परवानगीची प्रत आणि झोपडीत संरक्षण पात्र ठरवण्यासाठी शासन नियमानुसार २००० पूर्वीचे आणि सध्याचे वास्तव्याचे पुरावे तात्काळ सादर करण्यास सांगण्यात आले होते. त्याअनुषंगाने काल शुक्रवारी येथील शेकडो रहिवाश्यांनी जी साऊथ विभाग कार्यालयात जाऊन आपली कागदपत्रे सादर केली आहे.
अनधिकृत ठरल्यास कारवाई -
वरळी कोळीवाड्यातील रहिवाशांनी सादर केलेल्या कागदपत्रांची छाननी केली जाणार आहे. या छाननीत जे रहिवाशी अनधिकृत ठरतील त्यांच्यावर पालिकेकडून कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.