मुंबई - शिवसेना कोणाची या वादावर सलग दोन दिवस सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाबाबत सोमवारी निर्णय होणार आहे. त्यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांच्याकडून कायदेशीर सल्ला घेतला. मुख्यमंत्र्यांचे 'नंदनवन' या शासकीय निवासस्थानी रात्री उशिरा भेट ( Ujjwal Nikam meets cm eknath shinde )झाली. दरम्यान, शिंदे सरकार कायदेशीररित्या काहीं मुद्द्यांवर अडचणीत येणार असल्याचे वकील निकम यांनी शिंदे यांना सांगितल्याचे समजते.
...म्हणून मुख्यमंत्र्यांनी निकम यांची घेतली भेट - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे शिवसेनेवर संकट ओढवले आहे. शिवसेनेने शिंदे यांच्यासह १६ आमदारांना अपात्र करावे, अशी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर बराच खळ झाला आहे. या प्रकरणावर सरन्यायाधीशांनीही शिंदे गटाच्या वकिलांना राजकीय पक्षांना महत्त्व देत नाही का, असा मुद्दा उपस्थित करत कोंडी केली आहे. तसेच शिंदे गटाच्या वकिलांना लिखित स्वरूपात म्हणणे मांडण्यास सांगितले होते. गुरुवारी देखील सरन्यायाधीशांनी शिंदे गटाच्या वकिलांना अडचणीत टाकणारे प्रश्न विचारले. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन व्ही रमणा यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी सुरु आहे. सोमवारी पुन्हा यावरती सुनावणी होईल. त्याचप्रकरणी कायदेशीर सल्ला घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावले होते.
'...तरी न्यायाधीश कायद्याला धरून निर्णय' - राज्याच्या राज्यपालांनी सरकार अल्पमतात आहे का, याची न केलेली चाचपणी, विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी बोलवलेले अधिवेशन आणि शिंदे गटाच्या १६ आमदारांविरोधात असलेल्या अपात्रतेच्या कारवाईचा मुद्दा गोत्यात आणू शकतो का? यावर उज्वल निकम यांनी सल्ला दिला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाचा राजीनामा दिला. मात्र, राज्यपालांनी सरकार बनवण्यास दिलेली मंजुरी अडचणीत आणू शकते. तसेच, तुम्हाला वेगळा गट तयार करावा लागेल, अन्यथा दुसऱ्या पक्षात सामील व्हावे लागेल, असा संविधानाचा कायदा सांगतो. त्यामुळे न्यायालयात कितीही युक्तिवाद केला तरी न्यायाधीश कायद्याला धरून निर्णय घेतात. त्यामुळे हा मुद्दा कशा पद्धतीने सोडवला जाईल, याबाबत निकालापूर्वी जास्त बोलणे योग्य ठरणार नाही, असे निकम यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितल्याचे समजते.
'थोडं थांबा मंत्रिमंडळ नंतरच करा' - सध्या प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने मंत्रिमंडळ नेमण्याची घाई करू नका, असा सल्ला उज्वल निकम यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिल्याचे समजते. आधीच सर्वोच्च न्यायालयाने दहा दिवसांची मुदत दिली असताना तुम्ही सरकार स्थापन केले. आता मंत्रिमंडळ विस्तार झाला तर न्यायालयाचा अवमान होईल, आणि तुम्ही कारवाईस पात्र व्हाल, असा सल्लाही दिल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. सुमारे दीड तास मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांच्या चर्चा झाली. दरम्यान, पुढील कायदेशीर बाबी कशाप्रकारे हाताळता येतील, यावर सतत सल्ला देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी निकम यांना केल्याच्या समजते.
कोण आहे उज्वल निकम? - हायप्रोफाईल केसमध्ये राज्य सरकारचे वकील म्हणून उज्वल निकम अनेकदा बाजू मांडतात. त्यांच्या भक्कम वकिलीमुळेच आतंकवादी कसाब सारख्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा झाली. कायदेशीर सल्ला देण्यात निकम नेहमीच आघाडीवर असतात. आजवर निकम यांनी लढलेल्या प्रकरणात सरकारला यश आले आहे. त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गटातील वादावर उज्वल निकम यांचा कायदेशीर सल्ला घेणार असल्याचे समजते.
हेही वाचा - Sanjay Raut family : शरद पवार संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार, सूत्रांची माहिती