मुंबई - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना विधानपरिषद आमदार करण्याबाबत अद्याप राज्यपालांकडून कोणताही निर्णय आला नाही. मात्र, काही दिवसांतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विधानपरिषदेत जाण्याचा मार्ग निश्चितच सकारात्मक होणार आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील यात काही शंका नाही, असा विश्वास शिवसेना आमदार संजय पोतनिस यांनी व्यक्त केला आहे.
दोन महिन्यांपासून कोरोनाने संपूर्ण जगाला आणि देशाला ग्रासलेले आहे. या परिस्थितीत महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे मंत्री काम करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनाचे रुग्ण आटोक्यात आणण्यात यशस्वी झालेलो आहोत. ते राजकीय आणि कौटुंबिक भावनेने ज्या पद्धतीने मुख्यमंत्री सूचना करीत आहेत. त्या सूचनांचे जनता काटेकोरपणे पालन करत आहे.
महाराष्ट्राच्या जनतेने उद्धव ठाकरे यांना मनापासून मुख्यमंत्री म्हणून स्वीकारले आहे. महाराष्ट्रातील सर्व खासदार सर्वपक्षीय आमदार त्यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाच्या पाठीशी आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रीपदी उध्दव ठाकरे कायम राहतील असे पोतनिस यांनी सांगितले.