मुंबई - आमदारांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत धुसफूस वाढली आहे. त्यात आता शिवसेनेचा चिन्ह आणि पक्ष ताब्यात घेण्याच्या हालचाली शिंदे गटाने सुरू केल्या आहेत. सध्या प्रकरण न्यायप्रविष्ठ असून, निर्णय देण्यापूर्वी शिवसेनेची बाजू ऐकून घ्यावी आणि त्यानंतरच निकाल जाहीर करावा, अशी मागणी शिवसेना पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली ( Shivsena Moved Central Election Commission ) आहे.
शिवसेना सोडली नसल्याचा दावा - बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांचा गट तयार करत भाजपच्या पाठिंबावर सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांच्या बंडाला ठाणे, नवी मुंबई, पालघर आदी भागातून समर्थन होत आहे. दुसरीकडे शिंदे गटाकडून आम्ही शिवसेना सोडली नसल्याचा दावा केला जातोय. हे सगळं प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. आज ( 11 जुलै ) सुनावणीवेळी न्यायालयाने प्रकरण खंडपीठाकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेकडून न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लक्ष - दोन तृतीयांश आमदार आमच्याकडे आहेत. त्यामुळे शिवसेनेचं चिन्ह आणि पक्ष आम्हाला मिळावा यासाठी एकनाथ शिंदे गटाने जोर लावला आहे. तर, शिवसेनेकडून चिन्ह आणि पक्ष राखण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी आज केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली. खासदार अनिल देसाई आणि राज्य विधानसभेचे माजी संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला लिहिलेले पत्र दिले. त्यामध्ये शिवसेनेची बाजू ऐकून घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नका, अशी मागणी केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोग याबाबत काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.
शिवसेनेची डोकेदुखी वाढली - 'धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे. ते कोणालाही हिरावून घेता येणार नाही. शिवसैनिकांनी देखील याबाबत चिंता करण्याची गरज नाही,' अशी ग्वाही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात दिली होती. परंतु, शिंदे गटाकडून सातत्याने पक्ष आणि चिन्हावर दावा केला जात असल्याने शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे.