मुंबई - लोकसभेत मंजूर झालेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाला शिवसेनेच्या खासदारांनी पाठिंबा दिला होता. हिवाळी अधिवेशनात सोमवारी(दि.09 डिसेंबर)ला नागरिकत्व विधेयकावरुन गदारोळ झाला. अखेर संध्याकाळी 311 मतांनी विधेयक मंजूर झाले. तर 80 मते विरोधात पडली होती.
या विधेयकाला शिवसेनेने दिलेल्या पाठिंब्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. विधेयकाबद्दल स्पष्टता येईपर्यंत राज्यसभेत पाठिंबा देणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गृहमंत्री अमित शाह यांनी सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली; परंतु, सेनेच्या प्रश्नांना उत्तरे न दिल्याने आम्हाला अधिक स्पष्टिकरणाची गरज असल्याचे ते म्हणाले.
पुढे बोलताना, या विधेयकाला पाठिंबा देणारे देशभक्त आणि विरोध करणारे देशद्रोही असे चित्र सत्ताधारी उभे करत आहेत. परंतु,या भ्रमातून बाहेर यायला हवे, असे ठाकरे म्हणाले.
सध्या राज्यसभेत 240 खासदार आहेत. संबंधित विधेयक मंजूर करण्यासाठी भाजप सरकारला 212 मतांची गरज आहे. आत्ता भाजपच्या पाठिशी 83 खासदार असल्याचे चित्र आहे. यातच तेलंगणा राष्ट्र समितीने अंग काढून घेतले असून त्यांनी विधेयकाला विरोध दर्शवला आहे. एआयडीएमके या पक्षाचे 11 खासदार आहेत. तसेच सेनेचे 03 खासदार आहेत.