मुंबई - देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री झाले तर, ते मराठा आरक्षणासाठी कोर्टाला आदेश देणार आहेत काय, असा सवाल करत भाजपाचे खासदार उदयनराजे यांनी यासंदर्भात केलेल्या विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक समाचार घेतला.
भाजप खासदार उदयनराजे यांनी नुकतेच मराठा आरक्षणासंदर्भात एक विधान केले आहे. महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हेच आले तर, ते याचा निर्णय घेऊ शकतात, असे ते म्हणाले होते. भाजप नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी ही मराठा आरक्षण हा विषय राज्य सरकारचा असल्याचा दावा केला होता.
हेही वाचा - सकल मराठा समाज : 'पक्ष सोडून कोणत्याही नेत्यांनी आमच्यासोबत यावं'
त्यावर प्रतिक्रिया देताना मलिक यांनी सांगितले की, मराठा आरक्षणाचा विषय हा सर्वोच्च न्यायालयात असून तो तिथे सुरू आहे. अशा स्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस हे सर्वोच्च न्यायालयाला मराठा आरक्षण द्या म्हणून आदेश देणार आहेत काय, असा सवाल करत मलिक यांनी उदयनराजे यांच्यावर जोरदार टीका केली. भाजप नेत्यांना मराठा आरक्षणासंदर्भात काही करावेसे वाटत असेल तर, त्यांनी मोदी साहेबांना सांगून सर्वोच्च न्यायालयातील आदेश मिळवून द्यावेत. असे करता येत नसेल तर, एखादा निर्णय, विषय हा न्यायप्रविष्ट असताना त्यावर महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करण्याचे या नेत्यांनी थांबवले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
हेही वाचा - 'शेतकरी आहेत म्हणून देश आहे; मोदींनी त्यांच्याशी चर्चा करायला हवी..'