मुंबई - भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज कृष्णकुंजवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. ही भेट मराठा आरक्षणासंदर्भात असल्याचे बोलले जात आहे. मात्र ही भेट सदिच्छा भेट असून, कोणतीही पक्षीय चर्चा झाली नसल्याचे उदयन राजे यांनी सांगितले आहे.
उदयनराजे भोसले हे आज संध्याकाळी 5 वाजता कृष्णकुंजवर पोहोचले होते. त्यांच्यासोबत त्यांचे काही सहकारी देखील या भेटीदरम्यान उपस्थित होते . राज्यतील परिस्थितीच्या अनुषंगाने या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. पहिल्यांदाच उदयनराजे भोसले हे राज ठाकरे यांना भेटत असल्याने या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.
भेटीदरम्यान राजकारणावर चर्चा नाही
दरम्यान या भेटीमध्ये राजकारणावर चर्चा झाली नाही, आज राज ठाकरे यांची भेट घेतली. उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी शरद पवार यांची देखील भेट घेतली आहे. त्यांना आरक्षणाबाबत संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली आहे. कोणाच्या आरक्षणावर गदा येता कामा नये, इतर समाजाला जसा न्याय मिळाला, तोच न्याय मराठा समाजाला मिळायला पाहिजे. अशी प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी या भेटीनंतर दिली आहे.
चुकीचं केलं असेल तर शिक्षा व्हावी
देशात लोकशाही आहे, सर्व आमदार खासदार लोकशाही पद्धतीने निवडून आले आहेत. सर्वांनी जबाबदारीने वागायला आणि काम करायला हवं. प्रत्येकाने नैतिक जबाबदारीने वागणं गरजेचं आहे. कायद्यात सर्व समान आहेत. चुकीचं केलं असेल तर शासन व्हायलाच हवं. मग तो कोणीही असो अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी संजय राठोड प्रकरणावर दिली आहे.
लग्न सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी घेतली भेट
उदयनराजे भोसले यांनी कौटुंबिक लग्न सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी आज मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली. या भेटी दरम्यान उदयनराजे भोसले यांनी राज ठाकरे यांना राजमुद्रा भेट दिली, तर राज ठाकरे यांनी शाल आणि श्रीफळ देऊन उदयनराजेंचा सत्कार केल्याची माहिती मनसेच्या वतीने देण्यात आली आहे.