मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) कालिना संकुलातील जवाहरलाल नेहरूग्रंथालयातील अनेक दुर्मिळ पुस्तके, विविध संदर्भ ग्रंथ, जुनी वर्तमानपत्रे यांना वाळवी लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दखल घेत विद्यापीठ प्रशासनाला चांगलेच धारेवर घेतले आहे. मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाने गांभीर्याने काम करावे, विशेष लक्ष देऊन तातडीने नवीन ग्रंथालयामध्ये ग्रंथसंपदा स्थलांतर करण्याचे निर्देश सुद्धा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मुंबई विद्यापीठाला दिले आहेत.
ग्रंथाचे जतन आवश्यक
मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाने गांभीर्याने काम करावे. खूप जुने ग्रंथ येथे उपलब्ध आहेत. त्यांचे जतन आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. या इमारतीमध्ये विद्यार्थी अभ्यासासाठी बसतात. येथे काही दुर्घटना होऊ नये याकडे विशेष लक्ष देऊन तातडीने नवीन ग्रंथालयामध्ये ग्रंथसंपदा स्थलांतर करावी यासाठी आवश्यक त्या परवानग्या तातडीने संबंधितांनी द्याव्यात, असे निर्देशही सामंत यांनी यावेळी दिले.
कामगारांना तातडीने वेतन द्या
कंत्राटी कामगारांना नियमाप्रमाणे वेतन वेळेवर दिले पाहिजे. अनेक कामगारांना वेतन नियमानुसार मिळत नसल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त होत आहेत त्यावर विद्यपीठाने तातडीने कार्यवाही करावी आणि कामगारांना वेतन द्यावे, असे निर्देश मंत्री सामंत यांनी दिले. मुंबई विद्यापीठ नवीन ग्रंथालय इमारत, नवीन परीक्षा भवन, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतीगृह, मुलींचे वसतीगृह या इमारतीचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत लवकर उद्घाटन करण्याचा निर्णय ही बैठकीत घेण्यात आला. एमएमआरडीएनी विद्यापीठाचा बृहतआराखडा लवकर सादर करावा. मुंबई विद्यापीठात लवकर जनता दरबारचे आयोजन करण्यात येणार असून यामध्ये विद्यार्थी, शिक्षक शिक्षेकतर कर्मचारी, विविध प्राध्यापक संघटना यांच्या तक्रारी, पेंशन विषय, प्रलंबित मेडिकल बिल, अनुकंपा भरती याबाबत निर्णय घेण्यात येईल. या जनता दरबारमध्ये सहभागी होण्याचे आवाहनही यावेळी सामंत यांनी केलं.
हेही वाचा - Budget Session 2022 : भाजपचे निलंबित 12 आमदार अर्थसंकल्प अधिवेशनाला राहणार हजर; अध्यक्षपदासाठी रस्सीखेच