मुंबई - शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी मुंबईतील वांद्रे येथील मुस्लीम समाजातील शिवसैनिकांनी अनवाणी पायाने देवाजवळ प्रार्थना करत मन्नत ठेवली आहे. जोपर्यंत शिवसेनेचा मुख्यमंत्री होत नाही, तोपर्यंत आपण अनवाणी पायाने फिरू अशी प्रतिक्रिया या दोन्ही शिवसैनिकांनी ईटीव्ही भारतसोबत बोलताना दिली.
हेही वाचा... देवेंद्र फडणवीस यांच्या रुपात शिवसैनिकच मुख्यमंत्री - सुधीर मुनगंटीवार
राज्यात सध्या शिवसेना व भाजप यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदावरून जोरदार रस्सीखेच होताना दिसत आहे. युतीत ठरल्याप्रमाणे शिवसेनेलाही मुख्यमंत्रीपद हवे आहे. भाजप सत्ता स्थापनेच्या ऐन वेळी शिवसेनेला मुख्यमंत्री पद देऊ इच्छित नाही, त्यामुळे मुंबईतील मुस्लीम बांधव शिवसैनिकांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी मन्नत ठेवली आहे.
हेही वाचा... मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार हीच गोड बातमी, संजय राऊतांनी भाजपला डिवचले
राज्यात विधानसभेचे निकाल लागून चौदा दिवस उलटले तरीही नवीन सरकार स्थापन झालेले नाही. शिवसेना भाजप यांच्यात युतीवेळी दिलेल्या 50-50 च्या सुत्रानुसार, महाराष्ट्रातील सर्व शिवसेना आमदार तसेच शिवसैनिकांनी शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा, अशी मागणी लावून धरली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील वांद्रे येथे राहणारे शिवसैनिक मोहम्मद अजगर व मोहमद राशिद यांनी सेनेचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी देवाजवळ प्रार्थना करत गेल्या काही दिवसांपासून अनवाणी पायाने उपवास केलेला आहे.