मुंबई - रस्त्यावरून जाणाऱ्या वाटसरूंना अडवून, त्यांच्याशी जुजबी ओळख काढून त्यांच्याजवळ असणारे सोन्याचे दागिने, पैशांचे पाकीट हातोहात लंपास करणाऱ्या बोलबच्चन गँगच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या गँगची परिसरात चांगलीच दहशत होती. गँगमधील दोघांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. नरेश जैस्वाल आणि संजय मांगडे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
हेही वाचा.... पुण्यात कोरोनाचा आणखी एक रुग्ण, राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १२ वर
या बोल बच्चन गँगच्या दोन्ही आरोपींनी आतापर्यंत मुंबईतील जवळपास १५० नागरिकांना गंडा घातला आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या एखाद्या अपरिचित व्यक्तीला गाठून जुजबी ओळखीवर आपण भेटलो होतो, असे हे दोघेही सांगायचे. यावेळी पीडित व्यक्तीने प्रतिसाद दिला तर त्याच्या गळ्यातली चैन, हातातली अंगठी किंवा हातातले ब्रेसलेटची स्तुती करायची. आणि बघण्याच्या बहाण्याने पीडित व्यक्तीच्या अंगावरील दागिने लंपास करायचे.
हेही वाचा... धक्कादायक ! पतीचा अंत्यविधी होताच पत्नीचीही गळफास घेऊन आत्महत्या
बोल बच्चन गॅंग ही मुंबईतली एक मोठी टोळी आहे. हातचलाखी, संमोहन त्याचसोबत बोलण्यात गुंतवून ही टोळी समोरच्याला गंडा घालते. ही बोल बच्चन गॅंग इतकी सराईत आहे की, तुम्हाला लूटण्याआधी तुमच्या आजूबाजूला फिरून तुम्ही काय चर्चा करताय? काय बोलतात? कोणाची नावे तुमच्या संभाषणात येतात? हे ऐकून त्याच माहितीच्या आधारे पीडित व्यक्तीशी ओळख काढतात. अटक आरोपी नरेश जैस्वाल याच्यावर 84 गुन्हे दाखल असून तो 20 गुन्ह्यात फरार आरोपी म्हणून घोषित आहे. तर संजय मांगडे या आरोपीवर 30 पोलीस ठाण्यात 61 हुन अधिक गुन्हे दाखल आहेत. तीन महिन्यांपूर्वी हे दोन्ही आरोपी जामिनावर सुटून आल्यावर विक्रोळी, टिळकनगर, भांडुप, सायनसारख्या परिसरात गुन्हे करीत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.