मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या लेखी परीक्षेला आजपासून सुरूवात होत आहेत. या परीक्षेला राज्यातून १४ लाख ८५ हजार ८२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ही परीक्षा ९ हजार ६३५ ठिकाणी होणार आहे. बारावीची परीक्षा दोन सत्रांमध्ये होणार असून पहिले सत्र सकाळी १०.३० ते दुपारी २ तर दुसरे सत्र दुपारी ३ ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत होणार आहे.
इतके विद्यार्थी देणार परीक्षा -
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात येणार्या बारावीच्या लेखी परीक्षेला ४ मार्चपासून सुरुवात होत आहे. राज्यातील १० हजार २७८ कनिष्ठ महाविद्यालयांमधून १४ लाख ८५ हजार ८२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये ८ लाख १७ हजार ६११ विद्यार्थी व ६ लाख ६८ हजार ८८ विद्यार्थिनी आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना परीक्षा कनिष्ठ महाविद्यालयाशेजारीच देता यावी, यासाठी राज्य मंडळाकडून २९९६ मुख्य केंद्र व ६६३९ उपकेंद्र असे ९६३५ केंद्रांचे नियोजन केले आहे.
सर्वाधिक नोंदणी विज्ञान शाखेची -
राज्यातून सर्वाधिक नोंदणी ही विज्ञान शाखेतून झाली आहे. विज्ञान शाखेतून ६ लाख ३२ हजार ९९४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्याखालोखाल कला शाखेतून ४ लाख ३७ हजार ३३६, वाणिज्य शाखेतून ३ लाख ६४ हजार ३६२, व्यावसायिक अभ्यासक्रम ५० हजार २०२, आयटीआयचे ९३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.