मुंबई - ही घटना अत्यंत वेदनादायी आहे. या आरोपीला सहा महिन्याच्या आत फासावर लटकवा. महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत, त्या संदर्भामध्ये कठोर कायदे करण्यासाठी आणि महिला सुरक्षिततेसाठी पावले उचलण्यासाठी तातडीने सरकारने विशेष अधिवेशन बोलवणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी दिली.
हिंगणघाट जळीतकांडातील पीडित तरुणीची अखेर मृत्यूशी झुंज संपली आहे. सोमवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास पीडितेला ह्रदयविकाराचा झटका आला. अखेर सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी तिची प्राणज्योत मालवली. जिल्ह्यातील हिंगणघाट येथील नांदोरी चौकात सोमवारी (३ फेब्रुवारी) प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळण्यात आले होते. यामध्ये ती ४० टक्के भाजली होती. तसेच तिचा चेहरा, श्वसननलिका पूर्णपणे जळाली होती. तिच्यावर नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू होते.