मुंबई - शहरात खासगी भूखंडावर अनेक वसाहती आहेत. त्या भूखंडावरील झाडे आणि फांद्या पालिकेकडून छाटली जात नाहीत. यामुळे राज्य सरकारचे झाडे लावण्याचे उद्दिष्ट मुंबईत पूर्ण होऊ शकत नाही, असा आरोप भाजप नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी केला आहे.
राज्य सरकारने यावर्षी 33 कोटी झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. राज्य सरकारच्या आवाहनानुसार आम्ही मुंबईमधील नगरसेवकांनी आपल्या विभागातील नागरिकांना झाडे लावण्याचे आवाहन केले. मात्र, विभागातील खासगी गृहनिर्माण संस्थानी आपल्या परिसरात झाडे लावण्यास नकार दिला. या रहिवाशीयांसोबत चर्चा केली असता पालिका खासगी जागेतील झाडांची छाटणी करत नाही. गृहनिर्माण संस्थेला झाडांची छाटणी करावी लागते. झाडे छाटणी केल्यावर कचरा टाकल्यास दंड आकारला जातो. ही झाडे मोठी झाल्यावर झाडे आणि फांद्यापडून दुर्घटना घडल्यास गृहनिर्माण संस्थांनाच दोषी धरण्यात येते. पालिकेने नेमून दिलेल्या कंत्राटदारांकडून झाडे छाटणी केल्यास हजारो रुपये द्यावे लागतात. अशा अनेक तक्रारींची माहिती प्रकाश गंगाधरे यांनी दिली आहे.
मुंबईत मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण संस्था या खासगी जागेवर आहेत. पालिका फक्त पालिकेच्या हद्दीतील झाडांची छाटणी करते. त्यामुळे नागरिक झाडे लावण्यास तयार नाहीत. यामुळे राज्य सरकारचा झाडे लावण्याचा संकल्प मुंबईत पूर्ण होऊ शकत नाही. त्यासाठी पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांची भेट घेऊन, खासगी जागेवरील झाडे आणि फांद्या पालिकेने मोफत कापाव्या अशी मागणी केली. या मागणीला आयुक्तांनी होकार दर्शवला आहे. मुंबईत झाडांची संख्या खूप कमी आहे. यामुळे पालिकेने खासगी जागेवरील झाडे कापण्यासाठी पुढाकार घेतला, तरच याची अंमलबजावणी करणे शक्य होऊन झाडे लावण्याचा संकल्प पूर्ण होऊ शकतो असे गंगाधरे यावेळी म्हणाले आहेत.